उद्धव ठाकरेंची साथ आणि मदतीमुळे महायुतीला प्रचंड यश, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

‘ही निवडणूक आपण महायुतीत लढवली. आपला सहयोगी पक्ष शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे देखील मी आभार मानतो. त्यांची या निवडणुकीमध्ये साथ आणि मदत आपल्याला राहिली. त्यामुळेच आपल्या महायुतीला प्रचंड मोठं यश प्राप्त झालं’, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपचे विधीमंडळातील नेता म्हणून बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर आभार प्रदर्शन करताना त्यांनी शिवसेनेसह साऱ्या मित्र पक्षांचे आभार मानले.

यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचेच सरकार येणार असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्याच्या जनतेने निश्चितच महायुतीला जनादेश दिला आहे. आपण जनते समोर महायुती म्हणूनच गेलो, महायुतीसाठीच मतं मागितली आणि जनतेने देखील महायुतीलाच अतिशय स्पष्ट असा जनादेश दिला आहे. त्यामुळे कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. अफवा आणि चर्चांवर विश्वास ठेवू नये. चर्चा सुरू राहू द्या, पण काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षात आपण प्रत्येक समाजाच्या आशाआकांशा पूर्ण केल्या. आणखी कामेही करायची आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद याच सरकारमध्ये आहे, असा विश्वास जनतेच्या मनात आपण निर्माण करू शकलो. म्हणूनच या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमताने निवडून दिले आहे, असेही ते म्हणाले.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे पुढल्या पाच वर्षांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक म्हणून काम केले, त्याच प्रमाणे पुढील पाच वर्ष रयतेची सेवा करायची असल्याचे ते म्हणाले.