कश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तान जबाबदार!- युरोपियन संघटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधून 370 कलम हटवणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब आहे. कश्मीरमधील दहशतवादाला संपूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानच दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करतो, असे सांगत युरोपियन संघटनेच्या खासदारांनी एकमताने हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे.

कश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱयावर आलेल्या 23 सदस्यांच्या युरोपियन शिष्टमंडळाने पाहणी करत तळागाळातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पाहणीचा लेखाजोखा सादर केला. त्यांनी म्हटले की, दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. पाकिस्तान कश्मीरमधील दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करत आहे. कश्मीरमध्ये दहशतवाद ही मोठी समस्या आहे. दहशतवादाच्या या लढाईत आम्ही हिंदुस्थानबरोबर आहोत.’

परिस्थिती सुधारत आहे!
युरोपियन संघटनेचे खासदार थियरी मरियानी यांनीही पाहणी दौऱयावरबद्दल माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘हिंदुस्थानात मी आतापर्यंत 20 वेळा आलो आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू या मोठय़ा शहरात मी फिरलो आहे. या शहरांप्रमाणेच आम्ही कश्मीरमध्ये फिरलो. कश्मीरची परिस्थिती जाणून घेतली. कश्मीरबाबत सरकारने उचललेली पावले योग्य असून आता परिस्थिती सुधारत आहे.’ बिल न्यूटन यांनीही काल बंगाली कामगारांच्या हत्येचा निषेध केला. शांततेचा पुरस्कर्ता देश असा हिंदुस्थानचा इतिहास आहे.

जखमी मजुराचा मृत्यू
कुलगावमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पश्चिम बंगालमधून आलेले पाच मजूर ठार झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मजुराचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहा झाली आहे. हे सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी होते. दरम्यान, या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

कलम हटवल्यापासून 13 परप्रांतीयांची हत्या
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर 28 सप्टेंबरपासून दहशतवाद्यांनी पुन्हा कारवाया सुरू केल्या. सार्वजनिक वाहतूक, व्यापार यात असलेल्या परप्रांतीय कामगार, मजूर आणि वाहनचालकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी आतापर्यंत 13 परप्रांतीयांची हत्या केली आहे. परप्रांतीयांची हत्या करून दहशत निर्माण करायचा दहशतवाद्यांचा डाव आहे.

…तर लोकांनी आम्हाला निवडून दिले नसते!
कश्मीरमध्ये पाहणी दौरा करणाऱया युरोपियन संघटनेचे खासदार हे नाझीवादी विचारसरणीचे आहेत, असा आरोप एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी यांनी केला होता. त्यावर कोणी आमच्याबद्दल काहीही मते बनवण्याआधी आमची योग्य माहिती मिळवा. आम्ही नाझीवादी विचारसरणीचे असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेच नसते, असे प्रत्युत्तर सगळय़ा खासदारांनी दिले आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही कश्मीरमध्ये येऊ द्या!
युरोपियन संघटनेचे खासदार निकोलस फेस्ट यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘युरोपियन संघटनेच्या खासदारांना सरकारने श्रीनगरमध्ये येऊ दिले, पाहणी दौरा करू दिला. त्याच धर्तीवर हिंदुस्थानातील विरोधी पक्षनेत्यांनाही कश्मीरचा पाहणी दौरा करू दिला पाहिजे. परदेशी खासदारांना एण्ट्री आणि देशातील खासदारांना नो एण्ट्री असे होता कामा नये,’ असे फेस्ट म्हणाले.

युरोपियन खासदारांना भेटणाऱया काँग्रेस नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
श्रीनगरमध्ये युरोपियन खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेणाऱया काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांना पक्षातर्फे बुधवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. पक्षाचा विरोध असताना तुम्ही युरोपियन खासदारांना भेटलातच कसे, असा जाब विचारत काँग्रेसने उस्मान मजीद, फारुक अंद्राबी आणि सुरेंदर सिंह या तीन नेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.