
भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला 11 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात आहे. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानत कोणत्याही अफवा व चर्चांवर विश्वास ठेवू नका, चर्चेशिवाय मजादेखील येत नाही. त्यामुळे चर्चा सुरू राहू देत, चिंतेचे कारण नाही. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, अशी ग्वाही दिली.
भाजपच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यासाठी विधान भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराम भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले.
पुढील दहा वर्षे फडणवीसच मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षे सक्षमपणे कारभार सांभाळला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाशिवाय अन्य कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही. पुढील दहा वर्षे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भगवे फेटे आणि घोषणा
विधान भवनात भगवे वातावरण झाले होते. विधान भवनाच्या पायऱयांवर नवनिर्वाचित आमदार उभे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यावर त्यांना फेटा बांधण्यात आला. नवनिर्वाचित आमदारांनीही फेटे बांधले होते. त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांनी विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार सेंट्रल हॉलमध्ये रवाना झाला. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष भाजप आमदार करीत होते.
महायुतीला कौल
राज्यात कोणत्याही पक्षाला 75 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. 2014 व 2019 मध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. हा महायुतीला मिळालेला कौल आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महायुतीचा विजय
विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यावर केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढवली. सहयोगी पक्ष शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. उद्धव ठाकरे यांच्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.



























































