
आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली व्होडाफोन ही कंपनी हिंदुस्थानातील आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे ‘इंडो एशियन न्यूज सर्व्हिस’ (आयएएनएस) या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. व्होडाफोनने ‘पॅक अप’ केले असून ही कंपनी कोणत्याही क्षणी हिंदुस्थानच्या मार्केटमधून आपला गाशा गुंडाळेल, असे वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. मात्र याबाबत व्होडाफोनने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.
टेलिकॉम इंडस्ट्रीला कर्जाच्या संकटाने घेरले असतानाच व्होडाफोनचा हिंदुस्थानातील व्यवसाय पूर्णपणे तोटय़ात गेल्याचे वृत्त पुढे आले आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीत रिलायन्स जिओने एन्ट्री केल्यानंतर व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांचे विलीनीकरण झाले. दोन्ही कंपन्या संयुक्तपणे कारभार करीत असतानाही व्होडाफोन डबघाईला आली आहे. प्रत्येक महिन्याला कंपनीचे लाखो ग्राहक कमी होऊ लागले आहेत. व्यवसायातील तोटा आणि बाजार भांडवलातील घसरण या कारणांमुळे व्होडाफोनने हिंदुस्थानातून काढता पाय घेण्याची तयारी केल्याचे आयएएनएसने म्हटले आहे.
दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटींचा तोटा
व्होडाफोनला गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत 2,757.60 कोटींचा तोटा सोसावा लागला होता. यंदा या कालावधीत तोटा जवळपास दुपटीने अधिक म्हणजेच 4,067.01 कोटींवर गेला. अशातच सर्वोच्च न्यायालयाने एजीआर निकालाशी संबंधित 28,309 कोटी रुपयांच्या भरपाईचा आदेश दिला आहे. कोटय़वधीचा तोटा, कर्ज आणि त्यात भरपाई अशी एकामागून एक संकटे मागे लागल्यामुळे व्होडाफोन हिंदुस्थानात ‘आऊट ऑफ कव्हरेज’ जाण्याची चिन्हे आहेत.

























































