
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जत ते मंकी हिलदरम्यान मध्य रेल्वेने महिनाभर दुरुस्तीचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे कार्य चालणार असल्यामुळे पाच रेल्वे गाडय़ा रद्द व इतर काही गाडय़ांचा मार्ग वळविण्यात आला आहे. गाडय़ा रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने नियमित फेऱयांव्यतिरिक्त मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर 70 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवनेरी बसच्या मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी 278 (जाता-येता) फेऱया प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच 36 निमआराम वाहतुकीच्या फेऱया मुंबई-पुणे मार्गावर सुरू आहेत. याबरोबरच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणेमार्गे जाणाऱया 290 फेऱया उपलब्ध आहेत. म्हणजेच पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज 465 फेऱया प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या ठाणे विभागाने-20, मुंबई विभागाने- 15, पुणे विभागाने- 15, शिवनेरी बससेवेच्या – 20 अशा 70 जादा फेऱयांचे दररोज नियोजन केले आहे.























































