
पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीबाबत उत्तर प्रदेश कोर्टाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरोधात हायकोर्टात धाव घेतलेल्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा याला दिलासा देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. गाझियाबाद पोलिसांकडून अद्याप अजामीनपात्र वॉरंटची प्रत मुंबई पोलिसांना प्राप्त झाली नसल्याचे अतिरिक्त सरकारी वकील ऍड. जयेश याज्ञिक यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणल्याने हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली.
गाझियाबादमधील राजनगर येथे राहणारे प्रॉपर्टी डीलर सतेंद्र त्यागी यांची रेमोने फसवणूक केली होती, तसेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचाही त्यागी यांचा आरोप होता. याप्रकरणी रेमोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील दंडाधिकारी न्यायालयाने रेमोला समन्स बजावले. समन्स बजावूनही रेमो गैरहजर राहिल्याने 23 ऑक्टोबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.



























































