
नगर शहरातील मध्यवस्तीत एप्रील महिन्यात किरकोळ वादातून झालेल्या वृध्द महीलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थनिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. आरोपी करण नारायण दिनकर ( वय 20, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला ताब्यात घेत नगर येथे आणून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
10 एप्रिल रोजी दुपारी भारस्कर कॉलनी, लालटाकी येथे माया वसंत सिरसाठ (वय 35, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी व त्यांचे शेजारी राहणारे सारिका संतोष भारस्कर यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. सारिका संतोष भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन विक्रम दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर, करण दिनकर व इतर 14 ते 15 आरोपींनी माया सिरसाठ यांना तसेच त्यांची सासू बेबी अर्जून सिरसाठ, दिर सचिन सिरसाठ, विनोद सिरसाठ, संतोष सिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण केली. तसेच बेबी अर्जून सिरसाठ यांची हत्या केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन आरोपी नितीन विक्रम दिनकर (वय 30, रा. पाथर्डी), मुकेश विष्णू दिनकर ( वय 32 ) यांना यापुर्वी ताब्यात घेतले होते. मात्र, करण तेव्हापासून फरार होता. पोलीस पथकाने पाथर्डी परिसरात सापळा लावून त्याला अटक केली आहे.






























































