
अतिवृष्टी व महापुरामुळे जळकोट तालुक्यातील शेतातील पिकांची माती झाली असून शेतकरी या संकटाने हतबल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी जळकोट तालुक्यातील शेकडो शेतकरी शनिवारी जळकोटच्या तहसील कार्यालयावर धडकले. तातडीने न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन संघटना व शेतकरी यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. तालुक्यातील चेअरमन, शेतकरी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, तसेच ऑनलाईनची अट न ठेवता पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जळकोटचे तहसीलदार संदीप कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी एस. आर. पाटील यांना धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अरविंद महाजन उपस्थित होते.
शेतकरी व चेअरमन यांच्या या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख संगम टाले, चेअरमन बालाजी पवार, मनोहर गोंड, धनराज पाटील, मुजमील मुंडकर, भानुदास पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर भोपळे, बालाजी सिंदगीकर, ओमकार टाले, कृष्णा भुरे, मनोज तगडमपल्ले, विनोद देवशेट्टे, गोविंद डांगे ,माधव पाटील, भास्कर गोंटे, हणमंत नागलगावे, बालाजी कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. पीक वीमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी व अन्य शेतकऱ्यांना राज्य शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. ही मागणी शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिले.


























































