केळणा नदीला पूर; पेरजापूरात घुसले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे केळणा नदी तुडुंब भरून वाहत आहे.  जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या पेरजापूर गावाजवळील नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍याने पुराच्या पाण्यामुळे धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठी असलेल्या पेरजापूर गावातील मुख्य रस्त्यावर नदीचे पाणी घुसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाचा जोर शुक्रवारी रात्री वाढल्यामुळे केळणा नदीला मोठा पूर आला आहे. केळणा नदीचा उगम सिल्लोड तालुक्यात होत असल्यामुळे त्या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पाझर तलावांमधूनही पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पेरजापूर, प्रल्हादपूर, सुभानपूर, गोकुळ या गावांचा संपर्क तुटला आहे. भोकरदन शहरातून आलापूरला येण्यासाठी असलेल्या दानापूर वेशीतील पूलावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे आलापूर, उस्मान पेठ, प्रल्हादपूर, वाडी, भिवपूर, नवलवाडी, वाकडी आसडी या गावांचाही संपर्क तुटला आहे. भोकरदन जाफराबाद मुख्य रस्त्यावर असलेला व जीर्ण झालेला जाफराबाद पूलावरून पाणी वहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोकरदन-जाफराबाद या मुख्य रस्त्याचा संपर्क बंद होण्याच्या मार्गावर आहे. पाणी पातळीत झापट्याने वाढ होत असल्यामुळे पेरजापूर ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.