भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, घटकपक्षांची राज्यपालांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

भाजप आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेसंदर्भात कोणतीही हालचाल सुरू नाही. अशा परिस्थितीत महायुतीतील घटक पक्षांनी आता पुढाकार घेतला आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही यावेळी राज्यपालांना निवेदन देऊन करण्यात आली.

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात रासपचे प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संदीप पाटील, रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.

वडय़ाचे तेल वांग्यावर
एखाद्या राजकीय पक्षाने एका विशिष्ट तारखेपर्यंत सरकारची स्थापना न केल्यास काय होईल असा प्रश्न विचारण्यात आला. याकर घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे सहज उत्तर दिले. याबाबत राग येणे हा वडय़ाचे तेल वांग्यावर आणि वांग्याचे तेल वडय़ावर काढण्याचा प्रकार असल्याचे भाजप नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला तरीदेखील काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना घेणार नाही. याचे कारण या दोन्ही पक्षांची विचारधारा पूर्णपणे भिन्न आहेत. भाजप आणि शिवसेनेचे नाते पाण्यासारखे आहे. पाण्यावर कितीही काठी मारली तरी पाणी दुभंगत नाही, तसेच भाजप-शिवसेनेचे असल्याचे ते म्हणाले.