कस्में वादे प्यार वफा… आणि प्रियकर झाला फरार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमात जन्मोजन्मी साथ देईन, अशा आणाभाका घेणारे प्रेमवीर पुष्कळ असतात. पण, प्रत्यक्ष परिस्थिती ओढवली की भले भले प्रेमातून काढता पाय घेतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये घडला आहे. एकीशी प्रेम करून दुसरीशीच लग्न करणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अलिगढ येथील इगलास इथल्या संदीप तोमर नावाच्या तरुणाचा विवाह ठरला होता. विवाह निश्चितीचे काही विधी सुरू होते. या विवाहाबाबत गावात चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा संदीपच्या प्रेयसीपर्यंत पोहोचली आणि तिचा तिळपापड झाला. तिने थेट प्रियकराचं घर गाठलं आणि सोबत पोलिसांनाही आमंत्रण पाठवलं. मग, काय.. मंगल कार्यात दंगल सुरू झाली.

तरुणीच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि संदीपचे फार पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. ती अल्पवयीन असल्यापासून त्यांच्यातलं नातं सुरू झालं होतं. दोघांनी एकमेकांची मरेपर्यंत साथ देण्याचं वचनही एकमेकांना दिलं होतं. मात्र, संदीपने ऐनवेळी भलतीशीच लग्न करण्याचा घाट घातला होता. त्याच्या या कृत्यामुळे तरुणीची बदनामी झाल्याचा दावाही तिने केला. लग्न करण्यासाठी विचारणा केल्यानंतर संदीपने आणि त्याच्या मावशीने तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला.

या प्रकरणामुळे संदीपच्या घरी काही काळ गोंधळ माजला होता. अखेर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून संदीप आणि त्याच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण, गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप फरार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू झाला असून संदीपला पकडण्यासाठी शोध केला जात आहे