
‘स्वच्छ भारत’ योजनेतंर्गत अनेक मंत्री आणि नेते परिसराची स्वच्छता करताना दिसले आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारमधील एक मंत्र्याने जनतेच्या तक्रारीनंतर स्वतः नाल्यात उतरून स्वच्छता केली आहे. मध्य प्रदेशातील खाद्यमंत्री प्रद्युम्न सिंह तोमर रविवारी ग्वाल्हेरच्या बिरला नगर भागात पोहचले. तेव्हा स्थानिकांनी त्यांना भेटून परिसरातील समस्यांची माहिती दिली. परिसरातील एका नाल्यात गाळ साचला आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे रोगराई परसत असल्याचे स्थानिकांनी तोमर यांना सांगितले. त्यानंतर तोमर यांनी नाल्याची पाहणी केली. तेथील अस्वच्छता बघून ते स्वतः नाल्यात उतरले आणि नाल्याची सफाई करण्यास सुरुवात केली.
मंत्री स्वतः नाल्यात उतरून सफाई करत असल्याचे पाहून स्थानिकांनीही त्यांना मदत केली. याआधीही तोमर यांनी ग्वाल्हेरमधील नाल्यात उतरून स्वच्छता केली होती. त्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी तोमर यांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकातही शौचालयांची स्वच्छता केली होती. तोमर यांनी स्वतः नाल्यात उतरून स्वच्छता केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तोमर यांनी जनतेत चुकीचा संदेश दिल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे.
नाल्याची पाहणी केल्यानंतर तोमर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नाल्याची सफाई करण्याची गरज होती. ते स्वतः नाल्यात उतरल्याने जनतेत चुकीचा संदेश गेल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. ते स्वच्छतेसाठी नाल्यात उतरले, मात्र त्यांना ग्लोव्ज किंवा बूट घातले नव्हते. सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना तोमर यांनी केलेल्या कृतीवर टीका होत आहे. प्रशासकीय यंत्रणा योग्य काम करत नसल्यानेच मंत्र्यांना नाल्यात उतरून सफाई करावी लागवी, असा चुकीचा संदेशही जनतेत गेल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
























































