
हेरगिरीबाबत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला गेल्या सप्टेंबरमध्येच दुसऱ्यांदा अलर्ट केले होते. परंतु त्यानंतरही सरकारकडून काहीच पावले उललली गेली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचाही फोन हॅक केला गेला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
व्हॉट्सअॅपने इस्रायली तंत्रज्ञान ‘पिगासस स्पायवेअर’च्या मदतीने जगभरातील सुमारे 1400 महत्त्वाच्या व्यक्तींच्या फोनची हेरगिरी केल्याची कबुली दिली होती. त्यात राजकीय नेत्यांसह पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील 121 व्यक्तींची हेरगिरी केल्याचे व्हॉट्सअॅपने कबूल केले आहे. हिंदुस्थान सरकारला त्याबाबत दोन वेळा कल्पना दिल्याचा दावाही व्हॉट्सऍपने केला आहे.
इस्रायली हेरसंस्था ‘एनएसओ ग्रुप’वर खटला भरणार
इस्रायलमधील हेरसंस्था ‘एनएसओ ग्रुप’वर खटला भरण्याचा इशारा व्हॉट्सअॅपने दिला आहे. व्हॉट्सअॅपने सुरुवातीला दिलेली माहिती स्पष्ट नसल्याने व्हॉट्सअॅपकडून याबाबत अहवाल मागवण्यात आला असून त्याचा अभ्यास केला जात असल्याचे केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून सांगण्यात आले. सप्टेंबरमध्ये अहवाल दिला गेला आणि तत्पूर्वी मे महिन्यात या हेरगिरीबाबत सरकारला कल्पना दिली गेली होती, असे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. कोणाच्या इशाऱयावर ही हेरगिरी केली गेली याबाबत मात्र व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलेले नाही.
प्रियंका गांधींना व्हॉट्सअॅपकडून आला संदेश
ज्यांचे फोन हॅक केले गेले त्यांना व्हॉट्सअॅपकडून संदेश पाठवले जात आहेत. तुमचा फोन हॅक झाल्याचे वाटत असेल तर त्वरित आम्हाला कळवा असा तो संदेश आहे. असाच संदेश प्रियंका गांधी यांनाही आल्याचे काँग्रेस प्रवत्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. त्यामुळेच लोकंही आता बोलू लागली आहेत… ‘अब की बार जासुसी सरकार’ असे सांगत सुरजेवाला यांनी भाजपला लोकांनी ‘भारतीय जासुसी पार्टी’ असे नाव दिल्याचेही सांगितले. पिगाससचा वापर करून कोणते ब्रॉडबॅण्ड नेटवर्क करप्ट केले गेले याचीही माहिती काँग्रेसकडे असल्याचे त्यांनी सांगितले. व्हीएसएनएल आणि बीएसएनएलकडून चालवल्या जाणाऱया नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरमध्येही पिगासस स्पायवेअर सापडल्याने देशातील सर्वोच्च न्यायालय, संसद आणि कोणतेही राज्य सरकार हेरगिरीपासून सुरक्षित नाही हे सिद्ध होते, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.

























































