
सर्वोच्च न्यायालयात श्रीरामजन्मभूमी प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल 17 नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील मुस्लिमबहुल भागांमध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांच्या अरितिक्त तुकडय़ा तैनात करा अशी मागणी स्थानिक मुस्लिमांनी केली आहे. मात्र मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी आमचा पोलीस आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक, धार्मिक आणि राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणावर नोव्हेंबर महिन्यात निकाल येणार आहे. मुस्लिमबहुल भागांमध्ये काहींच्या मनात भीती आहे. या आधीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. मात्र जमीयत उमेला हिंदच्या अयोध्या शाखेच्या नेत्यांनी आमचा पोलीस आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पण त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या तुकडय़ाही तैनात करा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाने सगळय़ा प्रकारच्या सुरक्षेची हमी दिली.


























































