
महाराष्ट्रातील एकूण गंभीर परिस्थिती संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत बोलताना महत्त्वाची अशी माहिती दिली.
‘राज्यात प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाला आहे. तसेच चक्रीवादळामुळे देखील पावसाने झोडपून काढलं आहे. जवळपास 325 तालुक्यात शेतीचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीने मोठ्या मदतीची अपेक्षा आहे’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील संपूर्ण माहिती त्यांनी अमित शहा यांच्यासमोर ठेवली. शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न तातडीने सोडवण्याची केंद्राकडे विनंती केली असल्याचे सांगितले. केंद्र सककारने ही लवकर टीम पाठवण्याचे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले.
तसेच मोठ्या प्रमाणावर लोखो शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यांना विम्याची रक्कम तातडीने मिळावी अशी विनंती देखील करण्यात आली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय परिस्थिती संदर्भात प्रश्न विचारला असता ‘सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलताहेत यावर मी किंवा कोणताही भाजप नेता प्रतिक्रिया देणार नाही’, असं ते म्हणाले. राज्याला नव्या सरकारची आवश्यकता आहे, तसंच आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत आणि लवकरच नवं सरकार स्थापन होईल, असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.

























































