
मालवण शहरातील भंडारी हायस्कुल मार्गावरील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग पोलीस) यांनी दोघा संशयितांना दिवा (ठाणे) येथून ताब्यात घेतले. अभिषेक उदय दवणे (वय 19) , रोहीत भास्कर आदमाने (वय 20, दोन्ही रा. नवी मुंबई) या संशयितांना अटक करून रविवारी मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मालवण शहरातील भंडारी हायस्कूल मार्गावर भरवस्तीत असलेल्या गणेश अशोक पाटील यांच्या मालकीची आर.एस. कम्युनिकेशन ही मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील महागडे मोबाईल, इतर सामानासह रोख रक्कम असा एकूण 74 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. भरवस्तीत घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग पोलीस) अधिक तपास करत होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पथकाने अभिषेक व रोहित यांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण अद्याप फरार आहे. हे तिघे संशयित मालवण येथील एका मत्स्य व्यवसाईकाकडे आठ दिवसापूर्वी मुंबई येथून कामाला आले होते. मालवणात कामाच्या निमित्ताने येऊन चोरी करून ते पसार झाले. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.
























































