सावंतवाडी राज्य मानांकन कॅरम ; रत्नागिरीच्या आकांक्षाचे पहिले राज्यस्तरीय जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्य मानांकन स्पर्धेच्या महिला गटात अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या 14 वर्षीय आकांक्षा कदमने मुंबईच्या अनुभवी नीलम घोडकेविरुद्ध पहिला सेट 12-15 असा गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट 25-21 व 22-13 जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि या गटाचे विजेतेपद पटकाविले. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकरची भाची असलेल्या आकांक्षाचे हे पहिलेच राजस्तरीय विजेतेपद ठरले. रत्नागिरीतून यापूर्वी संदीप देवरुखकर, रियाझ अकबर अलीसारख्या खेळाडूंनी आपली छाप पाडली असून आकांक्षा ही रत्नागिरीतून पुढे येणारी पहिली महिला कॅरमपटू आहे.

पुरुष गटात मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्या संदीप दिवेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 25-12, 7-24 व 25-20 अशी मात करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. विकासचे हे दुसरे राज्यस्तरीय विजेतेपद ठरले आहे. अंतिम फेरीत मजल मारण्यापूर्वी आकांक्षाने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडवर 6-19, 25-16 व 17-16 असा निसटता विजय मिळविला होता, तर दुसरीकडे मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्याच मिताली पिंपळेला 21-3, 25-10 असे नमविले होते. पुरुष गटात अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी संदीपने पुण्याच्या अभिजितला 23-6, 20-17 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले होते, तर मुंबईच्या विकासने पुण्याच्या रहीम खानला 25-11, 25-4 असे नमविले होते. 

स्पर्धेतील विजेत्यांना सावंतवाडी संस्थांचे युवराज श्रीमंत लखम खेमसावंत भोसले यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, मानद सचिव यतिन ठाकूर, कै. शांताराम नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम गोसावी, ट्रस्टी नीलम पांजरी, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील धुरी, सचिव योगेश फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विलेपार्ले येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्या वतीने व  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहूच्या सहकार्याने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजी राजे मार्ग, कोलडोंगरी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे पुरुष एकेरी व महिला एकेरी गटासाठी रंगणाऱ्या या स्पर्धेकरिता आयोजकांतर्फे विजेत्यांना एकंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे आपल्या जिह्यांमार्फत 7 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनद्वारा ः अरुण केदार, 38/975, आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई – 30 येथे सायंकाळी 6 ते 8 दरम्यान नोंदवावीत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.