
जालना येथील एडीएसच्या पोलीसांनी एका मोटार सायकलचोराच्या मुसक्या आवळ्या असून त्याच्याकडून तब्बल 1 लाख 85 हजार रुपये किंमतीच्या आठ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जालना एडीएसचे प्रमुख यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, अकोला जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील लिंबी येथील विशाल इंगळे याने अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, जालना, शेगाव येथून मोटार सायकल चोरल्या असून काही मोटारसायकल त्याने त्याचा साथीदार रत्नदिप पांडे याच्याकडे ठेवल्या आहेत. त्यातील दोन मोटारसायकल विकण्यासाठी तो जेईएस कॉलेजसमोर येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे जाधव यांनी त्यांच्या पथकास सूचना देत जेईएस कॉलेजसमोर सापळा रचला. या मोटारसायकल चोराकडून एक हिरोहोन्डा शाईन मोटारसायकल विनानंबरची आढळली. त्यामुळे पोलिसांनी विशाल इंगळे (रा. लिंबी जि. अकोला) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जालना, संभाजीनगर, बुलढाणा येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडील आठ मोटार सायकल पोलिसांनी जप्तच केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्या, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, श्रीकुमार आडेप, संदीप चिचोले, आकाश कुरिल यांनी पार पाडली.
























































