
पक्षात कितीही त्रास झाला, कितीही अवहेलना झाली तरी पक्षातच आहे. माझी पक्षावर नितांत श्रद्धा असून साईबाबांचा श्रद्धा आणी सबुरीचा मंत्र मी जपतोय. मात्र अजून किती दिवस सबुरी ठेवायची? असा सवाल एकनाथ खडसे यांनी शिर्डीत साईदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज शिर्डी येथे सहकुटुंब साई दर्शनाला आले होते यावेळी पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.
भाजपवर माझी नितांत श्रद्धा असून पक्षात कितीही त्रास झाला, अवहेलना झाली तरीही मी पक्षातच आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र मी जपतोय मात्र मी किती दिवस सबुरी ठेवायची? का संपूर्ण आयुष्य सबुरी ठेवून काढायचं? कि हा श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं याचे संकेत मला साईबाबा देतील आणि त्यानुसार माझी राजकीय वाटचाल राहील असे खडसे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार परीस्थितीनूसार निर्णय घेत असतात त्यांचे निर्णय कधी योग्य तर कधी चुकीचे ठरले असतील. आघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा जनतेचा कौल असल्याने आम्ही विरोधी पक्षात बसणार हे शरद पवार यांचे वक्तव्य आहे. त्यानुसार दिलेल्या शब्दाप्रमाणे शरद पवार विरोधी पक्षामध्ये राहतील अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
विधीमंडळाचा नेता म्हणून फडणवीसांना सर्वांची मान्यता आहे सर्वात मोठ्या पक्षाचे फडणवीस नेते आहेत. शिवसेनेचं त्यास दुमत असू शकेल मात्र त्यांची मुख्यमंत्रीपदाची मागणी कोणत्या आधारावर हे सेनाच सांगू शकेल असेही खडसे यावेळी म्हणाले. तसेच फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




























































