हिंदुस्थानच्या नकाशावर नेपाळचा आक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान सरकारने जारी केलेल्या देशाच्या नकाशावर पाकिस्ताननंतर नेपाळनेही आक्षेप दर्शवला आहे. यासंदर्भात नेपाळ सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात हिंदुस्थानने ‘कालापाणी’ हे क्षेत्र हिंदुस्थानमध्ये असल्याचे दाखवले असून त्यास नेपाळचा विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे.

नेपाळच्या परराष्ट्रमंत्रालयाने बुधवारी एक परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात कालापाणी हे क्षेत्र नेपाळचा अभिन्न भाग आहे. नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेप्रती आम्ही कटीबद्ध आहोत. म्हणूनच याप्रकरणी आम्ही मित्रराष्ट्रांबरोबर चर्चा करणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच नेपाळ व हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या संयुक्त समितीवर या सीमा वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा करुन हा मुद्दा मार्गी लावण्यास आमची प्राथमिकता असून एकतर्फी निर्णय आम्हांला मान्य नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

हिंदुस्थानने शनिवारी नव्याने केंद्रशासित झालेल्या जम्मू-कश्मीर आणि लडाख या प्रदेशांचा सहभाग असलेला नकाशा जारी केला होता. यात उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात कालापाणीचा समावेश केल्याचे दाखवण्यात आल्याने नेपाळने यावर आक्षेप घेतला आहे. नेपाळ कालापाणीवर मालकी हक्क दाखवत असून तो दारचूला जिल्ह्याचा भाग असल्याचा दावा करत आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्रालयाकडून अदयाप यावर कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही.