
>> अभय मोकाशी
विविध क्षेत्रांत आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱया मुंबईचा आवाज आता शांत होत आहे. प्रत्येक बाबतीत मुंबईकर तडजोड करू लागले आहेत. मूलभूत सुविधांसाठीदेखील मुंबईकरांचा आवाज उठत नाही. आपल्या समस्यांविरुद्ध मुंबईकरांचा आवाज थंडावला आहे. ध्वनिप्रदूषण नको, पण तळगाळातील लोकांच्या न्यायासाठी आवाज उठविण्याची गरज आहे आणि हा आवाज फक्त समाजमाध्यमांतून नव्हे तर रस्त्यावर असण्याची आवश्यकता आहे.
मुंबईच्या ‘आवाज’ या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीत असे दिसून आले की या वर्षी दिवाळीच्या काळात मुंबईमध्ये आवाजाचे प्रमाण कमी होते, मात्र दोन दिवसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये 18 ठिकाणी या वर्षी जास्त आवाज होता.
या दोन संस्थांनी परस्परविरोधी दावे केले आहेत आणि यापैकी कोणता दावा खरा मानावा हे मुंबईकरांनी ठरवावे. मात्र सर्वसाधारण मुंबईकर यंदाची दिवाळी दरवर्षीपेक्षा जास्त शांत होती असे म्हणत आहेत. या वर्षी फटाक्यांचा आवाज कमी होता याचे कारण लोकांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतल्याने की महागाईने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना फटाके परवडले नाही हे या दोन्ही संस्था सांगू शकल्या नाहीत. जर मुंबईकरांनी ध्वनिप्रदूषणावर मात कराचे ठरविले असेल तर ते स्तुत्याचे आहे. ध्वनी आणि वायुप्रदूषण करून आनंद कसा व्यक्त केला जातो हे अनेकांच्या समजण्यापलीकडचे आहे. ज्यांना फटाक्यांचा आवाज आवडतो त्यांनी आपल्या मोबाईलवर फटाक्यांचे आवाज हेडफोन लावून ऐकावे म्हणजे त्याचा त्रास इतरांना होणार नाही.
मुंबईकरांनी फटाक्यांचा आवाज कमी करायचे ठरविले असले तरी या शहराने आणि इथल्या लोकांनी त्यांचा आवाज करण्याचा इतिहास विसरू नये. या शहराने आणि इथल्या लोकांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर आवाज उठवला आहे तसेच अनेक बाबतीत पहिले पाऊल उचलले आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यात मुंबईची मोठी भूमिका आहे. मुंबईने आणि मुंबईकरांनी ज्या विष्यायांवर आवाज उठवला आहे ते सर्व विषय येथे मांडणे शक्य नाही, पण काही प्रमुख मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
महागाईने त्रस्त झालेले मुंबईकर हे विसरले आहेत की या शहरात अनेकांनी महागाईविरुद्ध आवाज उठविला आहे आणि लढा दिला आहे. 1960 च्या दशकात तारा रेड्डी, अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी महागाईविरुद्ध लाटणे मोर्चा आणि थाळी वाजवा आंदोलन छेडले होते. त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानेदेखील स्वतंत्रपणे महागाईविरुद्ध आंदोलने केली होती. आज महागाईविरुद्धचा सर्वच पक्षांचा आणि जनतेचा आवाज फक्त माध्यमांतून ‘ऐकू’ येतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशात अनेक ठिकाणी इंग्रजांच्या सरकारविरुद्ध आवाज उठवला, पण 1908 साली लोकमान्यांना जेव्हा देशद्रोहाच्या ‘गुह्यासाठी’ सहा वर्षांचा कारावास सुनावण्यात आला तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी सहा दिवस संप केला. यातून त्यांनी आपले देशप्रेम आणि टिळकांना पाठिंबा दर्शविला. क्रूर इंग्रज सरकारने या संपकरी कामगारांवर गोळीबार केला ज्यात 15 कामगारांनी आपले प्राण गमावले.
याच शहरातील उच्च न्यायालयात लोकमान्य टिळकांनी त्यांना शिक्षा ठोठावल्यावर म्हटले होते, ‘या कोर्टातील पंचांच्या निकालानंतरही मी निर्दोष असल्याचा दावा करेन. माणसांवर आणि राष्ट्रांवर राज्य करणाऱया उच्च शक्ती आहेत आणि ही भविष्यवाणी असावी की मी ज्या उद्देशांचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यांची भरभराट मी मुक्त राहण्यापेक्षा माझ्या यातनांनी होईल.’
मुंबई इलाख्यातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनची स्थापना याच शहरात 1852 साली झाली आणि यात दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि नौरोजी फुरदुंजी यांची मोठी भूमिका होती. बॉम्बे असोसिएशनने 1853 सरकारमध्ये उच्च स्तरावर हिंदुस्थानींचा सहभाग असावा अशी मागणी करणारी याचिका ब्रिटिश संसदेला सादर करण्यात आली होती.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढय़ाचा इतिहास फार जुना आहे. ‘दीनबंधू’ या कामगारांसाठी प्रकाशित होणाऱया साप्ताहिकाचे संपादक नारायण मेघजी लोखंडे यांनी 1880 मध्ये फॅक्टरी कमिशनसमोर कामगारहिताचे मुद्दे मांडले होते. चार वर्षांनी त्यांनी बॉम्बे मिल हँडस् असोसिएशनची स्थापना केली आणि गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी संपाचे नेतृत्व केले. पुढे श्रीपाद अमृत डांगे, रुसी मेहता, जॉर्ज फर्नांडिस, दत्ताजी साळवी, दत्ता सामंत असे अनेक कामगार नेते मुंबईत लढले.
देशात राज्यांची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या प्रस्तावाला अनेक स्तरातून विरोध झाला आणि समाजवादी आणि कम्युनिस्ट नेत्यांमुळे इथल्या कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मोठय़ा प्रमाणात भाग घेतला. त्यावेळी दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री या दोन पत्रकारांनी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ प्रकाशित करून या आंदोलनाला हातभार लावला. पुढे पडबिद्री यांची दैनिक ‘सामना’चे पहिले कार्यकारी संपादक म्हणून नेमणूक झाली.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, तारा रेड्डी, जी. एल. रेड्डी अशा अनेक नेत्यांनी अग्रेसर भूमिका घेतली. हे आंदोलन जसे राजकीय नेत्यांनी गाजवले तसेच शाहीर अमर शेख यांनी आपल्या कलेने जनसामान्यांना या आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त केले. ब्रिटिश सरकरविरुद्ध मुंबईतून उठविण्यात आलेला आवाज विसरता येणार नाही. ब्रिटिशांना ‘चले जाव’ सांगणारे आंदोलन 1942 साली याचा शहरात सुरू झाले आणि पाच वर्षांत ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. त्या आधी जेव्हा स्वदेशी चळवळ सुरू झाली तेव्हा या शहरातील उद्योजकांनी त्याला साथ दिली. गोदरेजने बाजारात साबण आणला, तर ख्वाजा अब्दुल हमीद यांनी 1935 साली केमिकल, इंडस्ट्रियल ऍण्ड फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज (सिप्ला) या औषधनिर्मिती करणाऱया कंपनीची स्थापना केली. याआधी 1906 साली स्वदेशी माल विकण्यासाठी लोकमान्य टिळक, रतनजी जमशेदजी टाटा आणि द्वारकादास धरमसी यांनी एकत्र येऊन ‘द बॉम्बे स्वदेशी को-ऑपरेटिव्ह स्टोर्स’ कंपनीची स्थापना केली. आज ही संस्था ‘बॉम्बे स्टोर्स’ या नावाने प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध खिलाफत आंदोलनाद्वारे देशातील मुसलमानांनी आवाज उठवला. मौलाना शौकत आली आणि मौलाना मोहम्मद अली या दोन बंधूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. खिलाफत आंदोलन 1915 ते 1924 पर्यंत चालले आणि यात हिंदूंनीदेखील मोठय़ा प्रमाणात भाग घेतला. मुंबई या आंदोलनाचे मुख्य केंद्र होते.
देशाची औद्योगिक वाटचाल कशी असावी हे दाखविण्यासाठी जानेवारी 1944 मध्ये बॉम्बे प्लॅन तयार करण्यात आला. इंडियन नॅशनल काँग्रेसने 1931 साली आर्थिक धोरण आणि 1936 साली शेतीसंबंधी धोरणाची मांडणी केली. याचा आधार घेऊन बॉम्बे प्लॅन रचण्यात आला. या दस्तावेजावर जेआरडी टाटा, जी. डी. बिर्ला, सर अरदेशीर दलाल, लाला श्री राम, कस्तुरभाई लालभाई, अरदेशीर दाराबशा श्रॉफ, जॉन माथाई आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या स्वाक्षऱया होत्या.
विविध क्षेत्रांत आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या मुंबईचा आवाज आता शांत होत आहे. प्रत्येक बाबतीत मुंबईकर तडजोड करू लागले आहेत. मूलभूत सुविधांसाठीदेखील मुंबईकरांचा आवाज उठत नाही. या शहरात दररोज सरासरी 10 व्यक्तींचा जीव रेल्वे अपघातात जातो, खराब रस्त्यांमुळेही लोकांचे अपघात होतात. या आणि अशा अनेक समस्यांविरुद्ध मुंबईकरांचा आवाज थंडावला आहे. ध्वनिप्रदूषण नको, पण तळगाळातील लोकांच्या न्यायासाठी आवाज उठविण्याची गरज आहे आणि हा आवाज फक्त समाजमाध्यमांतून नव्हे तर रस्त्यावर असण्याची आवश्यकता आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
























































