
हरयाणाच्या 15 वर्षे 285 दिवस वयाच्या शेफाली वर्माने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यात 49 चेंडूंमध्ये 73 धावांची तुफानी खेळी करत ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा 30 वर्षे अबाधित विक्रम मोडला. शेफाली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारी हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरली आहे.
धडाकेबाज शेफालीच्या धडाकेबाज 73 धावांच्या खेळीच्या बळावर हिंदुस्थानी महिलांनी वेस्ट इंडीज महिला संघाला ग्रोस इसलेट येथील पहिल्या टी-20 लढतीत 84 धावांनी पराभूत केले. आपला कारकीर्दीतील पाचवा टी-20 सामना खेळताना 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 49 चेंडूंत आपली पाऊण शतकी खेळी तर केलीच, शिवाय डावखुऱया स्मृती मंधानासोबत 143 धावांची शतकी सलामी रचली. या भागीदारीच्या जोरावर हिंदुस्थानने 185 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱयापुढे वेस्ट इंडीजच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. संघाला 9 विकेट गमावून 101 धावाच करता आल्या.
शेफाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक
झळकावणारी सर्वात कमी वयाची क्रिकेटपटू
सचिनने 16 वर्षे आणि 214 दिवस वयाचा असताना पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याचा हा विक्रम 30 वर्षे अबाधित होता.
- z शेफाली-मंधाना जोडीची विक्रमी भागीदारी
शेफाली आणि मंधाना या दोघींनी हिंदुस्थानी संघाच्या वतीने टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रमही रचला. 2013 मध्ये थिरूष कामिनी आणि पूनम राऊत यांनी बांगलादेशविरुद्ध 130 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम शेफाली-मंधाना जोडीने या लढतीत मोडीत काढला.
- दुसऱयाच टी-20मध्ये शेफालीने चमक दाखवली होती
हरयाणाच्या या युवा क्रिकेटपटूने गेल्या महिन्यात सुरतमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कारकीर्दीच्या दुसऱया टी-20 सामन्यात 46 धावांची खेळी करून तिने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होतं. आपल्या कामगिरीला महिना उलटत नाही तोच तिने वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत अर्धशतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला विक्रम प्रस्थापित केला. तिने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.






















































