
या वर्षी निसर्गाने बदललेल्या कालचक्राचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावा लागत आहे. बदललेले ऋतूमान, अवकाळी पाऊस, वारंवार निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱया आठवडय़ात कोकणच्या पाणथळ भागात दाखल होणाऱया परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच ठिकाणी असलेले पाणवठे मात्र परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने ‘ओस’ पडले आहेत.
ऑक्टोबर सुरू झाला की कोकणातील पाणथळ भाग परदेशी पक्ष्यांनी अक्षरशः गजबजून जातात, मात्र या वर्षी पाणवठे काहीअंशी ओसच पडल्याचे चित्र दिसून येत असल्याने पक्षीमित्रांच्या घिरटय़ा मात्र पाणथळ भागात वाढल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे अनेक पक्ष्यांनी कोकणाची वेस ओलांडलेलीच नाही. दरवर्षी हमखास दिसणारे पाहुणे पक्षी मात्र या वर्षी जवळजवळ त्यांची संख्या घटलेलीच आहे. नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस त्यात समुद्र किनारपट्टीवर एकामागोमाग एक निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे परदेशी पाहुण्यांच्या प्रवासाला जणू काही ब्रेकच मिळाला आहे.
गेले अनेक वर्षे विनाखंड हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक देशांतील पक्षी पावसाळा संपल्यानंतर कोकणाची वेस ओलांडू पाहतात. त्यामध्ये अनेक पक्षी प्रजननाचा काळ आपल्या सोबत घेऊन येत असतात. कोकणातील रायगड, रोहा, उत्तर रत्नागिरी, श्रीवर्धन, ठाण्यातील काही खाडीचा भाग यासारख्या ठिकाणी तर तळ कोकणातील हर्णे, मुरुड, केळशी, आंजर्ले, अंजनवेल, गुहागर यासारख्या ठिकाणी मूळचा सायबेरीया या देशातील फ्लेमिंगो पक्षी व त्याच्यासह रशियातील असलेला सिगल पक्ष्याचे थवेच्या थवे थंडीच्या मोसमात दाखल होत असतात.
उशिरा पक्षी पोहोचणार
वातावरणात होत असलेला बदल सध्या पक्ष्यांना जरी मारक ठरत असला तरी आगामी महिनाभराच्या कालावधीत ओस पडलेले पाणवठे पक्ष्यांचा किलबिलाटांनी गजबजून जाण्याची शक्यता पक्षीप्रेमींमधून व्यक्त होत आहे.





























































