
रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपलेल्या युवकाला झोपेतच मृत्यूने गाठल्याची धक्कादायक घटना ओडिशामध्ये घडली आहे. रात्री मोबाईलचा स्फोट झाल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातील पारादीप-अठरबांकी परिसरात ही घटना घडली आहे. कुना प्रधान असे मृत युवकाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून जगन्नाथ ट्रक ओनर्स असोसिएशनच्या कार्यालय परिसरात एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे. तेथे गवंडी काम करणारा कुना प्रधान रविवारी रात्री आपल्या रूममध्ये मोबाईल चार्जिंगला लावून झोपला होता. रूममध्ये त्याचे अन्य तीन सहकारीदेखील झोपले होते. चौघे गाढ झोपेत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला आणि जागेवरच युवकाचा मृत्यू झाला. सदर स्फोट नेमका किती वाजता झाला याची माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जगतसिंहपूर येथील पोलिसांनी दिली.

























































