
बेस्टने वांद्रे बस स्थानक आणि माहुलगावदरमान्य धावणाऱया बसमार्ग क्र. 473 च्या मार्गात बदल करून आता तो नव्या बीकेसी कनेक्टरवरून जाणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसीला जोडणाऱया या नव्या उन्नत पुलाचे रविवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. या मार्गावरून ऑटोरिक्षा आणि दुचाकी यांना प्रवेश देण्याची मागणी होत असली तरी त्यासंदर्भात अद्याप विचार झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
बेस्टची मार्ग क्र. 473 वरून धावणारी वांद्रे बस स्थानक आणि माहुलगाव बसचा पूर्वी कलानगर व एव्हरार्ड नगरदरम्यान धारावी आगार, राणी लक्ष्मीबाई चौक-शीवमार्गे जाणारा मार्ग बदलून तो आता उद्यापासून कलानगर येथून वांद्रे -कुर्ला संकुल, भारतनगर, बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपूलमार्गे वळविण्यात येणार आहे. हा मार्ग आता कलानगर-खान अब्दुल गफारखान मार्ग-भारतनगर-एमएमआरडीए (पे ऍण्ड पार्क)-बँक ऑफ बडोदा-गोदरेज-बीकेसी-1-इंडियन ऑइल-बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपूल-एव्हरार्डनगर (परतीचा प्रवासमार्ग-एव्हरार्डनगर-बीकेसी-चुनाभट्टी उड्डाण पुल-कॅनरा बँक-नॅशनल स्टॉक एक्स्चेंज-बँक ऑफ इंडिया-जिओ गार्डन-भारतनगर जंक्शन-खान अब्दुल गफारखान मार्ग-कलानगर आणि याच्या पुढे नेहमीच्या प्रवासमार्गाने ही बस माहुलगावला रवाना होणार आहे.























































