
मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांना सील लावल्यानंतर आता मंत्रालयात मागील पाच वर्षांपासून साचलेली किमान तीन टन रद्दी आज भंगारात काढण्यात आली. प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातील जुन्या फाइल, कागदपत्रे, प्रस्तावांचे कागद, मंत्र्यांकडे आलेल्या अर्जांचे डोंगर साचले होते. पण नवीन मंत्र्यांना दालने वितरित करण्यापूर्वी रद्दी भंगारवाल्याकडे रवाना करण्यात आली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर मंत्रालयातील सर्व मंत्र्यांची दालने रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्र्यांची दालने रिकामी करण्यापूर्वी या दालनांमधील रद्दी, जुन्या फाइल गोण्यांमध्ये भरण्यात आल्या होत्या. या गोण्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यांवर दिसत होत्या. सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्र्यांच्या दालनाला कुलूप लावून दालने ताब्यात घेतली आणि गोण्यांमध्ये भरून रद्दी भंगारवाल्याकडे रवाना करण्यात आली.
मंत्र्यांच्या दालनातून जमा करण्यात आलेली सुमारे तीन टन रद्दी ट्रकमध्ये भरून भंगारवाल्याकडे रवाना करण्यात आली. दहा रुपये किलो दराने रद्दीची विक्री करण्यात आली. त्यामुळे आता मंत्र्यांची दालने स्वच्छ झाली आहेत.



























































