महिलेच्या व्हॉटस्ऍपवर अश्लील व्हिडीओ पाठवून अर्वाच्य शिवीगाळ, डिलिव्हरी बॉयला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगावात काम करणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेच्या व्हॉटस्ऍपवर अश्लील व्हिडीओ पाठवून पुन्हा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने शोधून काढले आहे. तो तरुण मेडिकल दुकानात डिलिव्हरी बॉयचे काम करतो.

तक्रारदार महिला या गिरगावात एका डॉक्टरकडे रिसेप्शनिस्टचे काम करतात. बुधवारी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटस्ऍपवर अचानक अश्लील व्हिडीओ आले. त्यामुळे महिलेने व्हिडीओ पाठविणाऱ्यास तू कोण आहेस असे विचारले तेव्हा आरोपीने महिलेला अर्वाच्य भाषेतील शिव्यांचा मेसेज पाठविला. यामुळे प्रचंड मनस्ताप झाल्याने महिलेने डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.

दरम्यान, युनिट-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष साळुंखे, उपनिरीक्षक अतिष लोहकरे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेला त्रास देणारा तरुण कामाठीपुरा परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कामाठीपुरा येथे जाऊन पोलिसांनी फरहान ऊर्फ फैयाज इस्तियाक शेख (19) याला पकडले. त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासला असता त्यानेच पीडित महिलेला अश्लील व्हिडीओ आणि शिव्या पाठविल्याचे स्पष्ट झाले.

ग्रुपमध्ये मिळाला मोबाईल नंबर
फैयाज हा कामाठीपुरा परिसरातील मेडिकल दुकानात डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तक्रारदार महिलादेखील एका डॉक्टरकडे कामाला असल्याने त्यांचा एक व्हॉटस्ऍप ग्रुप आहे. त्या ग्रुपमधून आरोपीने महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांना अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले.