
माणगावातील क्रिप्टजो कंपनी स्फोटात 18 जखमी झालेल्या 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या कामगारांवर नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचार सुरू होते. या स्फोटात होरळलेल्या, जखमी झालेल्या कामगारांपैकी काही कामगारांचे डोळे गेल्याचेही वृत्त आहे. जखमी कामगारांपैकी 3 जणांवर आय.सी.यूमध्ये उपचार सुरू आहेत. तर 11 जणांवर सामान्य वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
माणगाव तालुक्यातील विळे भागड भागातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या क्रिप्टजो प्रा. लि. कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 18 कर्मचारी होरपळल्याची घटना शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यातील पाच कर्मचारी हे गंभीर भाजल्याने त्यांना मुंबई जे जे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रिप्टजो कंपनी ही आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम बनवणारी कंपनी आहे. ही सिस्टम गॅसच्या साहाय्याने तयार केली जाते. शुक्रवारी दुपारी पाच वाजण्याच्या अचानक आग लागली आणि आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.



























































