
>> मुलाखत- शिल्पा सुर्वे
ज्येष्ठ नाटय़ अभिनेते मोहनदास सुखटणकर येत्या 21 नोव्हेंबर रोजी वयाच्या नव्वदीत पदार्पण करीत आहेत. यानिमित्त सहा दशके कार्यकर्ता, कलावंत अशा दुहेरीत भूमिकेत रमणाऱ्या सुखटणकर यांनी आठवणींचे संचित उलगडले.
- गोव्यातील माशेल ते मुंबई असा जीवनप्रवास तुम्हाला रंगमंचाच्या अधिक जवळ घेऊन गेला. एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आणि कलावंत अशी ओळख तुम्हाला मिळवून दिली. कसं घडत गेलं?
मी मूळचा गोव्यातील माशेल गावचा. 1950 साली मुंबईत आलो आणि मुंबईकर झालो. त्या वर्षी फक्त मॅट्रीकची परीक्षा दिली नाही तर एसएससीची परीक्षाही दिली. 1952 साली चर्चगेटच्या जयहिंद कॅलेजमध्ये प्रवेश घेतला. माझे आणि कॉलेजचेही ते पहिले वर्ष होते. तिथे प्रवेश अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांग लागली होती. त्या रांगेत माझ्याबरोबर ज्येष्ठ अभिनेता सुनील दत्तही होता. बीएपर्यंत तो माझा वर्गमित्र होता. एकाच बाकावर आम्ही बसायचो. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून मला सचिव केले. या वाङ्मय मंडळांतर्गत आम्ही अनेक कार्यक्रम केले. ‘लग्नाची बेडी’ नाटक केले. त्यात मी गोकर्णची भूमिका केली. ‘वहिनी’ या एकांकिकेत ‘वल्लभ’ ची गंभीर भूमिका केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या स्पर्धेत चारुशीला गुप्ते यांचा ‘आम्ही सारेच वेडे’ चा प्रयोग झाला. त्यात मी प्रौढाची विनोदी भूमिका साकारली. भारतीय विद्याभवनातील आंतर महाविद्यालयीन नाटय़ स्पर्धेत ‘भाऊबंदकी’त काम केले. गंगाधर गाडगीळ यांचे ‘वेडय़ाचा चौकोन’ही केले.
- पुढे धी गोवा हिंदू असोसिएशन आणि मोहनदास सुखटणकर असे घट्ट समीकरण जुळले, ते कसं काय?
1959 साली माझे आयएनटी स्पर्धेतील नाटक गोवा हिंदूच्या काही कार्यकर्त्यांनी बघितले होते. त्यांनी मला गाठून ‘तू गोव्याचा आमच्या संस्थेत असलंच पाहिजे’ असे सांगितले. मलाही आपल्या माणसांत जाऊन काम करण्याचा उत्साह वाटला आणि माझा संस्थेत प्रवेश झाला. त्यापूर्वीच स्पर्धेत संस्थेच्या ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’ नाटकांनी बक्षिसे मिळकली होती. ‘संशयकल्लोळ’ मध्ये भादव्या गडय़ाचं काम मी करू लागलो. ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’मध्ये काम केले. माझे जेव्हा संस्थेत पदार्पण झाले तेव्हा मला नायकाच्या भूमिका देऊन संस्थेने ‘युद्धस्य कथा रम्य’ आणि ‘मरणात खरोखर जग जगते’ ही गद्य नाटके रंगभूमीवर आणली. ही नाटके फार यशस्वी ठरली नाहीत तरी संस्थेत माझे स्थान पक्के झाले. कष्टाळू कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली. जवळपास 60 वर्षे संस्थेशी जोडला गेलो. एकही पैसा घेतला नाही. कार्यकर्ता कलावंत म्हणून वावरलो. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे पहिले व्यावसायिक नाटक संस्थेने केले. त्यामध्ये स्त्रीपात्र सोडून बहुतेक भूमिका साकारल्या. कुठल्याही नाटकाचा प्रयोग बंद पडू दिला नाही. ‘मत्स्यगंधा’चे पाचशे प्रयोग केले. ‘लेकुरे उदंड जाहली’चे पाचशे प्रयोग केलेय, अगदी परदेशातही केले. ‘अखेरचा सवाल’ हे ओरिजनल नाटक केले. ‘दुर्गी’, ‘स्पर्श’मधील माझ्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले.
- तुम्हाला कोणती भूमिका जास्त आवडली.
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘स्पर्श’ नाटकातील नाटेकर या भूमिकेने मला समाधान मिळवून दिलं. ‘स्पर्श’च्या माध्यमातून पहिल्यांदा मी गंभीर भूमिका केली. धी गोवा हिंदू असोसिएशनसाठी दामू केंकरेनी हे नाटक बसवलं. विनोदी भूमिकांप्रमाणे मी गंभीर भूमिकाही ताकदीने करू शकतो याची मला खात्री पटली. ‘दुर्गी’तील मोरोबा नाडकर्णी ही भूमिकाही मला विशेष आवडली.
- मास्टर दत्ताराम यांच्याविषयी तुमच्या खूप आठवणी आहेत.
होय, मास्टर दत्ताराम म्हणजे चमत्कार. रंगभूमीला काहून घेतलेला निर्गवी कलावंत. ते इयत्ता दुसरीत असताना घरांतून पळून गेले. प्रभात नाटक कंपनीत शिरले. त्यांनी नाटकाचे कुठलेही शिक्षण नव्हते. अगदीच सांगायचे तर एकदम अशिक्षित, पण त्यांच्या नाटकांनी प्रेक्षक असे काही गुरफटून जायचे की किचारू नका. मेकअप केला की ते, ते नसायचे. एंट्री घेईपर्यंत तोंडातून एक शब्दही काढायचे नाहीत. तसं पाहिलं तर त्यांच्यात सारंच उणं होतं. उंचीने बुटके, रंग काळा, डोळे किलकिले, आकाजही बरा नाही, नटाला देखणेपणा लागतो तो नसायचा. मात्र दत्तारामांनी मंचावर एंट्री घेतली की साऱ्यांनाच उंची प्राप्त व्हायची. ‘संगीत मत्स्यगंधा’चे पावणेपाचशे प्रयोग मी त्यांच्यासोबत केले. उंची काढावी म्हणून ते चवडय़ावर एंट्री घ्यायचे. त्यांचे असे अनेक चमत्कार मी बघितलेत. प्रसिद्धीसाठी, स्वतःच्या मार्केटिंगसाठी कधी पुढे आले नाहीत. काम झाले की खोबरेल तेलाने मेकअप काढला की ते निघून जायचे. त्यांना भरतमुनींचे नाटय़शास्त्र माहीत नव्हते की कोणी इंग्रजी नाटककार. पण नाटय़शास्त्रात जे लिहून ठेवलेय त्याची प्रत्येक गोष्ट मास्टर दत्तारामांच्या एंट्रीला दिसायची.
- मास्टर दत्तारामांप्रमाणे अनेक थोरामोठय़ांचा तुमच्या आयुष्याला, तुमच्या वास्तूला स्पर्श झाला असे तुम्ही सांगता…
खरंय…पु. ल. देशपांडे, तात्यासाहेब शिरवाडकर, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी यांच्याविषयी किती आणि काय बोलावं, आता उरल्या फक्त आठवणी. पुलंची नाटकं, ध्वनिफिती, पत्रं, माझ्याजवळ आहेत. तात्यासाहेब, पेंडसे, दळवी यांची हस्तलिखित मी जपून ठेकली आहेत. तात्यासाहेबांचा मी मानसपुत्र होतो. तात्यासाहेब, पुलं आणि माझा असा तिघांचा एकत्र फोटो आजही जीवापाड जपला.
- कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचा कार्यक्रम तुम्ही अनेक वर्षे केलात. त्यासाठी तुम्हाला स्टँडिंग ओव्हेशन मिळायचे. या कार्यक्रमाची प्रेरणा कुणाची?
प्रेरणा कुसुमाग्रजांचीच. त्यांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करणे हा माझ्या जीवनातील अत्युच्च आनंदाचा क्षण असायचा. 1970 साली कुसुमाग्रजांनी ‘नटसम्राट’ लिहायला घेतले तेक्हापासून माझा त्यांच्याशी परिचय झाला. ‘नटसम्राट’ या नाटकात नटसम्राट आणि स्त्रियांची भूमिका सोडली तर जवळपास 17-18 भूमिका मी केल्या. एकदा आम्ही नाशिकला गेलो होतो. तेक्हा कुसुमाग्रजांशी भेट झाली. ते मला म्हणाले, ‘नटाचे मनोगत’ या पुस्तकातील ककिता वाच. मी अवघ्या काही तासांत कविता पाठ करून त्यांच्यासमोर म्हटली. ते फार खूश झाले. त्यांनी कवितांची आणखी पाच-सहा पुस्तके मला दिली. त्यातील मी 25-30 कविता पाठ केल्या. नाशिकमध्ये विशाखा काव्यसंग्रहाच्या 50 व्या आवृत्ती प्रकाशनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी कुसुमाग्रजांच्या समोर कविता सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. खरं तर या कार्यक्रमाचे श्रेय शिवाजी पार्कच्या शशी मेहताचे. त्याच्यामुळे हे मला शक्य झाले. शशीमुळेच अनेक साहित्यिक मित्र माझ्या आयुष्यात आले. ‘शब्द नाटकातील, शब्द कवितेतील’ असे सुरुवातीला कार्यक्रमाचे नाव होते. पुढे मी अजय वैद्य, प्रदीप भिडे, मंगला खाडिलकर, विनिता आपटे यांच्यासोबत ‘शब्दकळा कुसुमाग्रजांच्या’ या नावाने कार्यक्रम केले. तेही खूप गाजले.
- आजच्या नाटकाविषयी काय सांगाल
आजची नाटकं चांगली आहेत, कलाकार चांगले आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट मला अधोरेखित करायचेय. ती म्हणजे नाटकाच्या अर्थकारणाची. आज नाटय़गृहात पहिल्या दहा ओळींच्या मागे कुणी प्रेक्षक नसतं. गॅलरीपर्यंत प्रेक्षक नसतो. नाटकाचं अर्थकारण बिघडण्याचे हे एक कारण आहे. याचा विचार झाला पाहिजे. आमच्या काळी जेव्हा तिकिटाचे दर सात रुपये, पाच रुपये असे होते तेव्हा सकाळी साडेआठ वाजता बुकिंग सुरू झाले की पहिला फोन सकाळी दहा वाजता यायचा. गॅलरी फुल्ल झाली असा निरोप यायचा. सध्या गॅलरी फुल्ल होणं ही दुर्मिळ गोष्ट झालीय. मध्यम वर्ग व त्याखालच्या कर्गाने नाटकं बघायची नाहीत का? त्यांच्या खिशाला परवडतील असे तिकीट दर असले पाहिजेत. त्याकाळी नाटय़निर्मिती करणाऱ्या पाच सहा संस्था असायच्या. आज 70-80 निर्माते आहेत. ज्यांना नाटकांतील काही कळत नाही ती मंडळी पैसा आहे म्हणून निर्माते बनतात.
- कोणती भूमिका करायची राहून गेलेय
माझ्याकडून खूप राहून गेलंय. अशी मोठी भूमिका, जिच्यामुळे माझं नाव होईल ती करण्याची संधी मिळाली नाही. उदाहरण द्यायचे झाले तर ‘लखोबा लोखंडे’ म्हटला की पणशीकर, ‘नटसम्राट’ म्हटलं की लागू… असे माझ्याबाबत झाले नाही. तब्बल 50 वर्षांहून अधिकचा काळ धी गोवा हिंदू असोसिएशनला वाहिला. बाहेर पडलोच नाही. एक पैसा घेतला नाही. माझी नाईट किती हे मला माहीत नव्हते. माझी किंमत मी केली नाही. संस्थेबाहेर न पडल्यामुळे मोठय़ा भूमिकांना मुकलो. कार्यकर्ता अखेरपर्यंत राहिलो, पण नट म्हणून मागे पडलो.
























































