
यंदा थंडीच्या मोसमात लेह-लडाख या निसर्गसंपन्न राज्यात सुट्टीची मजा लुटण्याचा प्लॅन आखत असाल तर बिनधास्त रहा. येथील कडाक्याच्या थंडीत गोठणाऱया डिझेलची चिंता मिटली आहे. अनेकदा फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर गाडीतील डिझेल गोठल्याने पर्यटकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते, पण आता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘द विंटर ग्रेड डिझेल’ लॉन्च केले आहे. -33 अंश सेल्सिअस तापमानातही हे डिझेल गोठणार नसल्याने पर्यटकांनाही विनाअडथळा फिरण्याचा आनंद घेता येणार आहे.
हिवाळ्यात बर्फवृष्टी झाल्यानंतर लडाख, कारगील, काजा आणि केलांगमध्ये स्थानिकांसह पर्यटकांनाही गोठणाऱया डिझेलच्या समस्येचा सामना करायला लागतो. गाडीतील डिझेल गोठल्याने पर्यटक कित्येक तास एकाच ठिकाणी ताटकळतात. त्यामुळे त्यांच्या सहलीचा पुरता खेळखंडोबा होता. काहींचा तर एक पूर्ण दिवस या समस्येमुळे वाया जातो. मात्र इंडियन ऑईलने खास लेह-लडाखसाठी आणलेल्या विंटर ग्रेड डिझेलमुळे पर्यटकांना फिरण्याचा पुरेपूर आनंद लुटता येणार आहे.
थंडीच्या मोसमात लेह-लडाखचे तापमान -25 ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे येथे हमखास डिझेल गोठण्याची समस्या उद्भवते.
इंडियन ऑईलच्या पानिपत रिफायनरीमध्ये विंटर ग्रेड डिझेल विकसित करण्यात आले आहे.
हे डिझेल -33 अंश सेल्सिअस तापमानातही गोठणार नाही.
10 टँकर डिझेल लडाखला रवाना
विंटर ग्रेड डिझेलचे दहा टँकर लडाखच्या दिशेने रवाना झाले आहेत. एका टँकरमध्ये सुमारे 10 हजार लिटर डिझेल आहे. उणे तापमानात आता वाहनचालकांना एकसारखे इंजिन गरम करण्याचीदेखील गरज नाही. त्यामुळे इंधनाचीही बचत होणार आहे.
अर्थव्यवस्था, पर्यटनालाही चालना
खास लेह-लडाखसाठी तयार करण्यात येणाऱया खास डिझेलमुळे थंडीच्या मोसमात पर्यटनामध्ये येणाऱया अडथळ्यांना आता पूर्णविरम मिळणार आहे. याकाळात डिझेलवर धावणाऱया येथील टॅक्सीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होतो, पण आता असे होणार नसल्यामुळे येथील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
असे बनवले विंटर ग्रेड डिझेल
पानिपत रिफायनरीमध्ये सामान्य डिझेल मोठय़ा प्रमाणावर तयार होते. हे विंटर ग्रेड डिझेल एका आठवडय़ात तयार करण्यात आले आहे. आठवडाभरात एक लाख डिझेल तयार केले आहे. ज्या उपकरणात सामान्य डिझेल तयार होते त्या उपकरणात काही बदल करून नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. बायोडिझेल आणि विंटर ग्रेड डिझेलचा काहीही संबंध नाही.




























































