क्रिकेटप्रेमींमध्ये गुलाबी चेंडूचीच चर्चा,कोलकात्यातील दिवस-रात्र कसोटी ठरणार संस्मरणीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यानच्या दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्याबाबतची उत्सुकता आता टिपेला पोहोचली आहे. मायदेशात प्रथमच दिवस-रात्र कसोटी होणार असल्यानेही आणि त्यातच या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होणार असल्याने क्रिकेटशौकिनांमधील कुतूहल वाढले आहे. लाल व पांढऱया चेंडूंच्या तुलनेत गुलाबी चेंडू कसा वेगळा आहे याबाबत हिंदुस्थानच्या नाक्यानाक्यावर अन् गल्लीबोळात चर्चा रंगू लागल्या आहेत. होय, चर्चा तर व्हायलाच हवी. कारण इतर चेंडूंच्या तुलनेत गुलाबी चेंडू तयार करायला अनेक दिवस काम करावे लागले. या चेंडूवर खेळताना खेळाडूंचेही कौशल्य पणाला लागणार असल्याने कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणारी ही दिवस-रात्र कसोटी खऱया अर्थाने संस्मरणीय ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील एसजी कंपनी मेरठमध्ये 1950 सालापासून असे चेंडू निर्माण करीत आहे. गुलाबी चेंडू हा इतर नियमित चेंडूपेक्षा नक्कीच वेगळा आहे. हा चेंडू तयार करण्यासाठी आठ दिवस लागतात. इतर चेंडू अवघ्या दोन दिवसांत तयार केले जातात. गुलाबी चेंडूला मशीनऐवजी हाताने तयार केले जाते. या चेंडूसाठी लागणारे चामडेही विदेशातून आयात केले जाते.

या गुलाबी चेंडूचा आतील भाग कॉर्प आणि रबरापासून तयार केला जातो. याचे वजन 156 ग्रॅम असून तो 22.5 सेंटीमीटर असतो. शिवाय या चेंडूवर तीन प्रकाराची शिलाई केली जाते. या चेंडूला एपूण 78 टाके मारले जातात. त्यामुळे गोलंदाजाला हा चेंडू पकडताना मदत मिळते.

गुलाबी चेंडू फ्लड लाइटमध्ये अधिक प्रमाणात वापरतात. त्यामुळे या चेंडूचा रंग लवकर उडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. तीन वेळा हा चेंडू रंगवला जातो. त्यामुळे इतर चेंडूंचा रंग 60 ते 70 मिनिटांत फिका पडतो, तर गुलाबी चेंडू दोन ते तीन सत्रापर्यंत कायम राहतो.

लवकर सूर्यास्तामुळे आमच्या फलंदाजांची ‘कसोटी’

कोलकाता शहरात सूर्यास्त लवकर होतो. त्यामुळे आमच्या फलंदाजांची ‘टीमइंडिया’विरुच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात खरी कसोटी लागणार असल्याची चिंता बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी यांनी व्यक्त केली. व्हेट्टोरी म्हणाले, गुलाबी चेंडूवर दिवसा खेळणे ही सामान्य बाब आहे. मात्र, सायंकाळच्या सत्रात खेळणे थोडे अवघड असते. कोलकात्यामध्ये साडेचारच्या दरम्यानच सूर्यास्त होत असल्याने यावेळी खेळताना बांगलादेशच्या फलंदाजांचा खरा कस लागणार आहे. मी कारकिर्दीत कधीच दिवस-रात्र कसोटी खेळलो नाही, पण टीव्हीवर पाहिली आहे. त्यामुळे सायंकाळचा दीड तासाचा खेळ खूप महत्त्वाचा असेल.

गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेटची आकडेवारी वेगळी असावी

पहिल्यांदा डे-नाईट आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला तेव्हा अशाप्रकारच्या क्रिकेटला भव्यदिव्य यश मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण डे – नाईट वन डे सामन्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. त्यामुळे आता डे -नाईट कसोटीलाही तसाच उदंड प्रतिसाद मिळेल. मात्र यामध्ये थोडा बदल व्हायला हवा. गुलाबी चेंडूसह खेळल्या जाणाऱया कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी ही वेगळी असायला हवी. त्याचा समावेश लाल चेंडूसह खेळल्या जाणाऱया कसोटी क्रिकेटमध्ये करायला नको, असे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना वाटते.