विद्यार्थ्यांसह पालकांची पंचायत समितीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील रामगड-बेळणे प्राथमिक शाळा 2 येथील पालकांनी गुरुवारी  शिक्षक मागणीसाठी शाळाबंद आंदोलन छेडले. शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना घेऊन पालकांनी पंचायत समितीत धडक दिली. शाळेत कायमस्वरूपी शिक्षक मिळावा अशी मागणी पालकांनी लावून धरली.

दरम्यान, पालकांची भूमिका जाणून घेत पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर व सुनील घाडीगांवकर यांनी शाळेतील शिक्षक प्रश्न तात्काळ सोडावा अशी मागणी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडॆ केली. अखेर गटविकास अधिकारी यांच्या आदेशानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेत कायमस्वरूपी शिक्षक देण्याची कार्यवाही केली. त्यांनंतर पालकांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला. रामगड-बेळणे शाळा नंबर 2 या प्राथमिक शाळेत 5 विद्यार्थी आहेत. एक मुख्याध्यापक व एक शिक्षक असे दोन शिक्षक कार्यरत असताना जुलै महिन्यात एक शिक्षक अन्य शाळेत शिक्षक कमी असल्याने त्या ठिकाणी दोन महिन्यांसाठी कामगिरीवर पाठवण्यात आले. मात्र 30 ऑगस्ट रोजी कामगिरीवर गेलेले शिक्षक पुन्हा येणे अपेक्षित असताना शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकाची कामगिरी मुदत वाढवली.

शाळेत असलेले मुख्याध्यापक हे मिटिंग, बैठका व अन्य शैक्षणिक कामासाठी पंचायत समिती, शिक्षण विभागात बहुतांश वेळी जात असल्याने शाळेत शिक्षकच नाही अशी स्थिती निर्माण होते. शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. अन्य स्पर्धा परीक्षेसाठी मुले तयारी करत असताना त्यातही त्यांना शाळेत शिक्षक नसल्याने अपेक्षित मार्गदर्शन मिळत नाही. याबाबत शिक्षण विभागास सातत्याने सांगूनही शिक्षक देण्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीत झालेल्या निर्णयानंतर पालकांनी कायमस्वरूपी शिक्षक मागणीसाठी शाळाबंद आंदोलन पवित्रा घेतला.

गुरुवारी पालक विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीत दाखल झाले. सभापती व अन्य सदस्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालकांनी माहिती देत कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी केली. सदस्य राजू परुळेकर व सुनील घाडीगावकर यांनीही मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेत तात्काळ शिक्षक देण्याची व्यवस्था करा अशी भूमिका मांडली. अखेर शिक्षण विभागाने दोन दिवसात कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे आश्वासन पालकांना दिले. त्यानंतर दुपारी पालकांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले.