
>> डॉ. हरिश्चंद्र बोरकर, लोककला अभ्यासक
दिवाळी झाल्यानंतर आता दिवस यात्रा, जत्रा, लावणी या लोककलांचे. यामध्ये विदर्भ स्वतःचे वैशिष्टय़ राखून आहे. मंडईत सादर केली जाणारी खडी गंमत या वेशिष्टय़पूर्ण लोककलेचे हे दिवस… पाहूया यातील खरी गंमत!
खडी गंमत…विदर्भातील सातशे वर्षांपूर्वीची लोककला…ढोलकी, फड, टाळ ही तालवाद्ये आणि तुणतुणे, चौंडकं या सूरवाद्यांच्या साथीने आजही ही कला सादर केली जाते… गमतीशीर नाव असलेल्या या लोककलेचं वैशिष्टय़ असं की, ती दिवाळीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत सादर होत असे, पण आता मात्र वर्षभर खडय़ा गमतीचे कार्यक्रम होतात. कालानुरूप यातील कथानकात बदलही झाले आहेत. विदर्भात दर्या, पांगूळ, डहाका, झडती, मंत्रगीते, दंडीगान, भिंगी, सोंग, राध, डरामा, दंडार असे अनेक लोककला प्रकार प्रसिद्ध असले तरीही त्यातील ‘खडी गंमत’ हा प्रकार वैशिष्टय़पूर्ण.
दिवाळीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस गावात मंडई असते. मंडई म्हणजे गावची जत्रा. गावात ‘दंडार’ किंवा ‘खडी गंमत’ ही कला सादर करणारी मंडळं असतात. गावची मंडळंच खडी गंमत लोककलेत भाग घेतात. संध्याकाळपासून सुरू होणारा कार्यक्रम रात्रभर चालतो, मंडईमध्ये दंडार आणि खडी गंमत असे प्रकार आहेत. दंडारमधूनच ‘खडी गंमत’ हा लोकनाटय़प्रकार उदयाला आला.
प्रत्यक्षात ही लोककला म्हणजे म्हणजे तमाशा नाहीच, कारण तमाशामध्ये स्त्रिया नाचतात, तर खडी गंमतमध्ये दोन मुलं नाचतात. त्यांनी साडी परिधान केलेली असते. खरं म्हणजे कोणत्याही लोककलेमध्ये महिला नसतात, तर पुरुष असतात. बरेच ठिकाणी पुरुषच स्त्रियांच्या भूमिका करतात. त्यामध्ये केवळ नाच नसतो. गण, गौळण आणि एखादं कथानक असतं. त्या कथानकावर एखादा प्रसंग असतो. ज्याला दुय्यम म्हणजे प्रश्नोत्तर असे म्हटलं जातं. कथानक हे एकव्यापी असतं आणि दुय्यम हे दोन बाजू असलेलं म्हणजे यामध्ये प्रश्नोत्तरं असतात. एकाने प्रश्न विचारायचा, दुसऱयाने उत्तरं द्यायची अशा प्रकारे हा कार्यक्रम असतो. प्रश्नोत्तरे ऐकणे, यावेळी एकमेकांची होणारी फजिती पाहणे… यामुळे रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि त्यातूनच त्यांची करमणूक होते. म्हणून आजही खडय़ा गमतीला प्रेक्षकांची गर्दी जास्त असते.
या लोककलेतील कथानकाचे विषय राष्ट्रीय असतात. विशेषतः दुय्यम प्रकाराला जास्त गर्दी असते. ज्याला ‘सामना’ म्हणतात. या कार्यक्रमाचं तिकीटही जास्त असतं. महत्त्वाचं म्हणजे आता शासनाने पॅकेज दिल्यामुळे खडी गंमतला मान्यता मिळालेली आहे. या कलेला व्यासपीठ मिळण्यासाठी लोककला महासंघ, अखिल भारतीय महासंघ तसेच शासनाचीही मदत होत आहे.
‘डफ गान’ची नवी आवृत्ती
‘डफ गान’ या प्रकाराची नवीन आवृत्ती म्हणजे खडी गंमत. महाराष्ट्रातली मोघलांच्या काळातली ही लोककला. एका सैनिकाच्या प्रमुखाला ही कला फारच आवडली. पाहताक्षणी तो म्हणाला, ‘व्वा! क्या तमाशा है’ अशा प्रकारे तिचं नामकरण झालं. मुळात बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत गेलेली ही खडी गंमत होती. त्या सैनिकाच्या कौतुकामुळे ‘खडी गंमत’ तमाशाची माय आहे. यात कारगील विषय, नोटाबंदी असे नवे वेगवेगळे चालू घडामोडींवरील सामाजिक विषयही असतात. पौराणिक आणि ऐतिहासिक विषय आता कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, खडय़ा गमतीत वेशभूषेला महत्त्व नसतं. केवळ अभिनयाद्वारे ही लोककला सादर केली जाते. उदा. काठी मारतो म्हटल्यावर काठी हातात नसते फक्त ती हातात असल्याचा आविर्भाव केला जातो.
वर्षभर ‘खडी गंमत’
पूर्वी फक्त दिवाळी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असे पंधरा दिवसच खडी गंमत चालत असे. आता मात्र बारसं किंवा एखाद्या कार्यक्रमातही ही लोककला सादर करतात. यामागचे विशेष कारण म्हणजे, फक्त मनोरंजन. या कलेत प्रेक्षकांच्या जीवनातलेच प्रसंग असतात. भाषाही त्यांना जवळची असते. समोरच्या माणसाला पाहून विनोद होतात. लेखी कुठे काहीच नसतं. सर्व जिवंत असतं. त्यामुळेच ते लोकांना भावतं. त्यांना आपलं वाटतं म्हणून ते तिला स्वीकारतात.
‘खडी गंमत’चे भविष्य…
खडी गंमत ही लोककला आता अजून वाढते आहे. खडय़ा गमतीतील 120 कलाकारांना शासनाकडून मदत मिळवून दिली आहे. त्यांचे गटही वाढतायत. त्याचं कारण असं की, कलाकारांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच खडी गंमतला चांगले दिवस आले आहेत. लोककला मरणार असे बोलले जाते, पण लोककला करणारे मेले तरी लोककला जिवंत आहे. म्हणूनच नवीन कथानक लिहिणारे, पोवाडे लिहिणारे अनेक लोककवी आज आमच्यासमोर आहेत.
पुरातन लोकनाटय़ाचे अनोखेपण
अतिशय पुरातन लोकनाटय़ असून त्याचे नाते चक्रधरांचे चरित्र असलेल्या बाराव्या शतकातील ‘लीळाचरित्र’ या मराठीच्या आद्यग्रंथाशी आहे. – या लोककलेचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो. देवीदेवता आणि गुरूंना वंदन केले जाते. याला ‘मुजरा’ म्हणतात. – खडी गंमत सादर करणाऱया कलावंताला विदर्भात शाहीर म्हणून संबोधले जाते. – संगीतबारीचा तमाशा आणि ढोलकी फडाचा तमाशा असे तमाशाचे दोन स्वतंत्र प्रकार असले तरीही विदर्भातील खडी गंमत आणि पश्चिम महाराष्ट्रातील तमाशा हे एकाच प्रकारचे लोककला प्रकार आहेत.
बैठी गंमत…
पोवाडा हा रचना प्रकार उभ्याने गाण्यापेक्षा बसून गाण्यातही मजा असते. म्हणून खडी गंमत अनेकदा बैठय़ा रूपातही सादर केली जाते. विशिष्ट सण आणि उत्सवाच्या निमित्ताने गावातील कोणाच्याही वाडय़ाच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थितीत बैठी गंमत रात्रभर सादर करतात. यांसह धुमाळी, छीटा, दोहा, बतावणी, मुजरा अशा अनेक छटा या दोनही लोककलांत रसिकांना अनुभवायला मिळतात.
पुरुषप्रधान लोककला का?
- गेल्या 20 वर्षांपासून या लोककलेत फक्त 8-10 महिलाच आहेत. त्या सर्व महिला शाहीर आहेत, मात्र त्यांच्याबरोबर नाचतात ते फक्त पुरुषच. कारण, पूर्वापार सुरू असलेली ही प्रथा कलाकारांना सोडायची नाही. म्हणून आजही पुरुषच स्त्रिया भूमिका निभावतात.
- हा कार्यक्रम रात्री बराच वेळ चालतो. एवढय़ा रात्रीपर्यंत स्त्रिया काम करू शकणार नाहीत असं काही कलाकारांचं म्हणणं आहे.
- एकही पात्र सादरीकरण करताना खाली बसत नाही. त्यामुळे ‘खडी गंमत’ हे नावदेखील कलेला यथार्थ असं आहे. जेवढा वेळ खडी गंमत सुरू असेल तेवढा वेळ सर्व पात्रं सतत उभीच असतात.






























































