‘टेलिकॉम वॉर’मध्ये उद्योगपती बिर्ला यांनी गमावले 21 हजार 500 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
birla

2017 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती 9.1 अब्ज डॉलर इतकी होती, मात्र आता त्यांची संपत्ती कमी होऊन ती सहा अब्ज डॉलरवर आली.

देशातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची संपत्ती दोन वर्षांत तीन अब्ज डॉलर म्हणजे 21 हजार 528 कोटी रुपयांनी घटली आहे. टेलिकॉम सेक्टरमधील तगडय़ा स्पर्धेमुळे बिर्ला यांना मोठा फटका बसला आहे.

व्होडाफोन-आयडियामधील दुसरे मोठे गुंतवणूकदार कुमार मंगलम बिर्ला आहेत. बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलरने मागील वर्षी व्होडाफोन या ब्रिटिश दूरसंचार कंपनीबरोबर विलीनीकरण केले होते, मात्र रिलायन्स जिओने उभ्या केलेल्या तगडय़ा आव्हानामुळे व्होडाफोन आयडियाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. व्होडाफोन-आयडियाचे शेअर डिसेंबर 2017 पासून आतापर्यंत 90 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

फक्त टेलिकॉम सेक्टर नव्हे तर देशाच्या जीडीपीत झालेली घसरण आणि अमेरिका-चीनदरम्यानचे ट्रेड वॉर यामुळे बिर्ला यांच्या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. बिर्ला समूह केमिकल्स, धातू, सिमेंट आणि दूरसंचार अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. आर्थिक मंदीचा परिणाम या बिर्ला यांच्या सर्व क्षेत्रावर झाला आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या हिंदाल्को इंडस्ट्री लिमिटेड, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या आघाडीच्या कंपन्या आहेत. या दोन्ही अनुक्रमे ऍल्युमिनियम आणि सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत.