बारामतीत शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. अजित पवार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काहीच माहित नसल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्यामुळे पवार कुटुंबात व पक्षात फूट पडल्याची प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यानंतर शरद पवार यांचा गड असलेल्या बारामतीत शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लागले होते.

‘आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत’ अशा आशयाचे पोस्टर्स संपूर्ण बारामतीत लागले होते. समस्त बारामतीकरांचा शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे या पोस्टर्समध्ये लिहण्यात आले होते. त्यामुळे बारामतीचे आमदार असलेल्या अजित पवारांविरोधात सध्या बारामतीमध्ये मोठा रोष पसरला आहे. असे असतानाच दुपारनंतर शरद पवारांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेली सर्व पोस्टर्स हटविण्यात आली. ही पोस्टर्स कुणी व का हटवली याबाबत अद्याप समजलेले नाही.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी काही आमदारांना फसवून राजभवनावर नेल्याचे सांगितले. तसेच शरद पवारांनी अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदावरून देखील हकालपट्टी केली. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे.