
हरयाणातील हिस्सार येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला राजस्थानातील नागौर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जण ठार झाले असून त्यापैकी सहा जण लातूर, दोघे सोलापूरचे तर बाकीचे परभणी, बीड व सांगली येथील आहेत. शनिवारी पहाटे 3 वाजता अचानक रस्त्यावर आलेल्या बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात या भाविकांची मिनी बस झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली. अपघातातील दोन मृत कर्नाटकचे असल्याचे सांगण्यात आले.
लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील याकतपूर येथून हरयाणातील हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मिनी बसने गेले होते. राजस्थानातील नागौर जिल्हय़ात कुचमानसिटी येथे राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे 3 वाजता रस्त्यावर अचानक बैल आडवा आला. या बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की मिनी बसचा चक्काचूर झाला. घटनास्थळावर रक्तमांसाचा चिखल झाला. अंधार असल्यामुळे जखमींच्या फक्त किंकाळय़ा ऐकू येत होत्या.
अपघातातील मृत
भगवान बेळंबे (50, याकतपूर, जि. औसा), श्यामजी गायककाड (55, कर्नाटक), सुमित्रा सांगवे (35, लामजना, ता. औसा), बळीराम पवार (27, कर्नाटक), मयुरी बेळंबे (18, याकतपूर, ता. औसा), रामचंद्र पवार (30, सांगली), गोविंद (वाहनचालक, 28, बीड), शिवप्रसाद ठाकूर (28, परभणी), सिद्धी गोवर्धन सांगवे (9, रा. लामजना, जि. औसा), शालूबाई वसंत शेळके (60, रा. चिलाईकाडी, सोलापूर), सुप्रिया बालाजी पवार (16, किल्लारी), अरुणा हणमंत तौर (55, किल्लारी, ता. औसा), रुक्मिणी ज्ञानेश्वर शेळके (चिलाईकाडी, जि. सोलापूर).
अपघातातील जखमी
ज्ञानेश्वर वसंत शेळके (35, रा. चिलाईकाडी, सोलापूर), ज्ञानेश्वरची मुलगी (8, रा. चिलाईकाडी, सोलापूर), अनोळखी 40 वर्षांची महिला, लक्ष्मी पांडुरंग शेळके (30, रा. चिलाईकाडी, सोलापूर), प्रताप वसंत शेळके (35, रा. चिलाईकाडी), आदर्श (6, सुमित्रा सांगके यांचा मुलगा), गायत्री ज्ञानेश्वर शेळके (6, ज्ञानेश्वरची मुलगी), श्रावणी (2, ज्ञानेश्वरची मुलगी), अनोळखी 7 वर्षांचा एक मुलगा.
ओळख पटवण्यात अडचण
कुचमानसिटीजवळ झालेल्या या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. नागौरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱयांशी तसेच पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. मात्र भाषेची अडचण निर्माण झाली. नावांचा, गावांच्या उच्चारात अडचण येत असल्यामुळे माहितीच्या देवाणघेवाणीतही अडचणी येत होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी औसा तहसीलदारांना माहिती देऊन याकतपूर गावातील भाविकांच्या नातलगांशी संपर्क साधला. अपघाताची माहिती कळताच याकतपूरमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. मृतांचे नातलग तातडीने राजस्थानकडे रवाना झाले.


























































