
गांजाचा वापर औषध म्हणून होऊ शकतो. त्यामुळे गांजाचा औषधासाठी वापर करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी करणारा डॉ. रेझा बोरहानी याचा खरा चेहरा अखेर समोर आला. ऑस्ट्रेलियावरून मुंबईतील हायप्रोफाईल नशेबाजांसाठी एलएसडी हा घातक ड्रग्ज घेऊन आला असता डॉ. रेझा याला अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 1 कोटी 8 लाख 56 हजार किमतीचा एलएसडीचा साठा जप्त केला.
कॅनाबिज हेल्थ ऍण्ड सायन्स प्रा. लिमिटेड या कंपनीचा संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. रेझा हा ऑस्ट्रेलियावरून मुंबईत आला असून तो वांद्रे पश्चिमेकडील दि हवॉयन शॅक हॉटेलासमोर एलएसडी ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, एपीआय प्रशांत मोरे व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून डॉ. रेझा तेथे येताच त्याला उचलले. त्याच्या अंगझडतीत 1 कोटी 8 लाख 56 हजार किमतीचा एलएसडीचा साठा सापडला. डॉ. रेझा हा मूळचा ऑस्ट्रेलियन असला तरी गुवाहाटी येथे त्याने कॅनाबिज हेल्थ ऍण्ड सायन्स प्रा. लिमिटेड ही संस्था सुरू केली आहे. गांजाचा वापर औषधासाठी होऊ शकतो. त्यामुळे गांजाच्या वापरासाठी मान्यता द्यावी अशी रेझाची मागणी आहे. डॉ. रेझाला एनडीपीएसचा चांगला अभ्यास आहे. डॉ. रेझा आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज तस्कर असण्याची शक्यता असून त्याची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.



























































