
हिंदुस्थानचा स्टार व अनुभवी बॉक्सर विजेंदर सिंग याची प्रोफेशनल बॉक्सिंगमधील विजयी घोडदौड शुक्रवारीही सुरूच राहिली. येथे झालेल्या या लढतीत विजेंदर सिंगच्या दमदार पंचेससमोर घाना देशाचा माजी राष्ट्रकुल चॅम्पियन चार्ल्स अदामु याची डाळ शिजली नाही. अखेर आठ फेऱयांनंतर त्याचा पराभव झाला. विजेंदर सिंगचा हा प्रोफेशनल बॉक्सिंगमधील सलग 12वा विजय ठरला. गेल्या चार वर्षांमध्ये विजेंदर सिंग याला एकाही लढतीत हार सहन करावी लागलेली नाही हे विशेष.
या लढतीत विजय मिळवल्यानंतर भिवानीतील बॉक्सर विजेंदर सिंग म्हणाला, मला तीन ते चार फेऱयांमध्ये या लढतीत विजय मिळवायचा होता, पण तसे झाले नाही. आठ फेऱयांमध्ये मला विजय मिळवता आला. चार्ल्स अदामु हा चांगला बॉक्सर आहे. त्यामुळे या लढतीसाठी मी कसून तयारी केली होती. त्याच्या पंचेसचा समर्थपणे मुकाबला करण्याचे ठरवले होते. तसेच त्याच्यावर आक्रमण करण्याची योजनाही आखली होती, असे हिंदुस्थानचा पठ्ठय़ा पुढे म्हणाला.




























































