
प्रियकराला वाचवण्यासाठी आईने स्वत:च्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अनिता असे त्या क्रूर मातेचे नाव असून तिने तिच्या पाच वर्षांच्या मुलाची गळा घोटून हत्या केली.
22 वर्षीय अनिताचे जयवीर नावाच्या एका युवकाशी लग्न झाले होते व तिला दोन मुले ही होती. याचदरम्यान तिची धीरज याच्यासोबत ओळख झाली होती. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून अनिताने नवऱ्याशी नाते तोडले व तिच्या एका मुलाला घेऊन प्रियकर धीरज सोबत रहायला लागली. धीरजचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने त्यांच्याकडे कायम पैशांची चणचण असायची. 20 नोव्हेंबरला धीरज दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी भुकेने व्याकूळ झालेला अनिताचा मुलगा रडत होता. त्याच्या आवाजाला कंटाळून धीरजने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मारहाणीमुळे मुलगा बेशुद्ध पडला. त्यानंतर संतापलेल्या अनिताने मुलाचा गळा घोटून त्याचा जीव घेतला.
इतक भयंकर कृत्य केल्यानंतर अनिताने मुलाचा मृतदेह गोणीमध्ये भरून खजूरी खास भागातील नाल्यात फेकला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दरम्यान पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. अनिता व धीरजला वाटले होते की आपल्याला कुणीच पाहिले नसेल पण त्यांनी मुलाचा मृतदेह फेकतानाची घटना तेथील एका सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती. फुटेजमध्ये एक व्हॅन दिसत होती व त्यात एक महिला व दोन पुरुष होते. त्या तिघांनी मिळूनव एक गोणी नाल्यात टाकली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीसांनी वॅनचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी व्हॅनचा मालक प्रदिपला पकडले. त्याची चौकशी केली व धीरज आणि अनिताला अटक केली.
























































