
परतीच्या पावसाने राज्यातील ज्वारीचे मोठे नुकसान झाले असून ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. उत्पन्न कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे गरिबांचे पौष्टिक अन्न म्हणून ओळख असलेली ज्वारीची भाकरी महागली आहे. ज्वारीबरोबर बाजरी, गहू, हरभरा, मका या पिकांनाही फटका बसला असल्यामुळे या पिकांच्या दरातही वाढ झाली आहे.
इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. मात्र, परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यासह पुण्यालाही झोडपल्यामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीच्या नुकसानीमुळे एकीकडे शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे तर गरिबांच्या तोंडातला ज्वारीच्या भाकरीचा घासही हिरावला जात आहे. बाजारात विक्रीसाठी आणलेल्या ज्वारीतही मोठी घट झाली आहे. ओल्या दुष्काळामुळे इंदापूर तालुक्यातील शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांना लागणारा कडबाही महागणार आहे.
पिकांचा दर प्रति क्विंटल
ज्वारीचा दर – 2800 ते 3800 रुपये
बाजरी – 1800 ते 2400 रुपये
गहू – 1900 ते 3700 रुपये
हरभरा – 3751 रुपये
मका – 1751 ते 1851 रुपये






























































