बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे आदेश हायकोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. तसेच प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी परिवहन विभागाची बैठक घेऊन त्याची माहिती प्रत्येक जिह्यातील विभागीय आयुक्तांना देण्यात यावेत असेही खंडपीठाने बजावले.

प्राण्यांना वाहनांमध्ये डांबून नेले जात असल्यामुळे प्राण्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्याविरोधात विनियोग ट्रस्टच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायामूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. परिवहन विभाग 125 ई कलमानुसार विशेष वाहन परवाना वाहन मालकांना देत असले तरी त्यासाठी लागणार्‍या अटी आणि शर्तींचे पूर्ण पालन करत नसल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. सहाय्यक सरकारी वकील ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडली. तसेच परिवहन विभागाच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र खंडपीठासमोर सादर करण्यात आले. त्यानुसार या नियमांचे उल्लघंन करणार्‍या 33 जणांवर कारवाई करण्यात आली असून काहीजणांवर कारवाईची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. हायकोर्टाने याची दखल घेत यापुढे एक राज्यस्तरीय बैठक घ्या, त्यात पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱयांनाही बोलवा आणि होणार्‍या निर्णयाची माहिती तथा अंमलबजावणीचे निर्देश प्रत्येक जिह्यातील परिवहन विभागाच्या अधिकाऱयांना द्या असे स्पष्ट केले.