
रंगभूषेने अनेक अनुभव दिले. अनेक दिग्गज कलाकारांचे चेहरे जवळून पाहता आले… सांगताहेत सचिन बारिक
रंगभूषा म्हणजे चेहऱयातील त्रुटी लपवून कलाकाराच्या व्यक्तिरेखेप्रमाणे त्याला साजेसं रूप देणं. मात्र त्यासाठी व्यक्तिरेखेचा अभ्यास करणंही आवश्यक असतं. मनात आलं आणि केलं असं नसतं. निरीक्षण, सातत्य, प्रयत्न, आवड या गुणांच्या बळावरच एखाद्या कलाकाराला रंगभूषाकार साजेसं रूप देऊ शकतो.
भद्रकाली संस्थेच्या ‘संगीत देवबाभळी’ आणि ‘सोयरे सकळ’ या नाटकांसाठी रंगभूषा करण्याची संधी मला मिळाली. या नाटय़ संस्थेशी सुरुवातीपासूनच जोडला गेलो. ‘संगीत देवबाभळी’मध्ये आवलीची (जिजा) भूमिका करणारी अभिनेत्री शुभांगी ही तरुण आहे. तिचा चेहराही फ्रेश आहे. अशा चेहऱयाला गांजलेल्या, रापलेल्या चेहऱयाची कळा आणणं हा माझ्यासाठी एक आनंददायी क्षण असतो. तसेच ‘सोयरे सकळ’ या नाटकातील सर्वच व्यक्तिरेखा या 1947 ते 2008 या प्रदीर्घ कालखंडातील आहेत. प्रवेश फ्लॅशबॅक पद्धतीने आहेत. एक 1947 चा तर दुसरा 2008 चा. अशा वेळी कलाकारांना सजवणं हे मोठं जोखमीचं काम आहे. विंगेत राहून ते करायला खूप मजा येते. या दोन्ही नाटकांसाठी मला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट रंगभूषाकार हा पुरस्कार मिळाला.
‘हम तो तेरे आशिक है ’ या नाटकात मुक्ता बर्वे, संजय मोने, जितेंद्र जोशी यांची रंगभूषा केली आहे. त्यावेळी मी प्रथमच व्यावसायिक नाटकासाठी रंगभूषेला सुरुवात केली होती. त्यामुळे धास्तावलेला, बावरलेला होतो. एका प्रयोगावेळी मुक्ता बर्वे स्वतःच मेकअप करत होत्या. त्या माझ्याकडे एक-एक वस्तू मागत होत्या. माझी तारांबळ होत होती. मेकअप पूर्ण झाल्यावर मॅडमनी मला बाजूला बसविले आणि ‘‘याला हे, याला हे’’ असं छान समजावून सांगितले. वास्तविक हे सगळं मी पूर्वी हाताळलेलं होतं, पण किंचितही न रागावता साहित्याची ओळख करून दिली. पहिल्याच भेटीतला हा अनुभव माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीला उमेद देऊन गेला. अभिनेता संजय मोने आणि जितेंद्र जोशी यांनी मी नवखा आहे याची जाणीवही मला कधी होऊ दिली नाही. ‘सखाराम बाईंडर’च्या वेळी तर ‘‘तूच मेकअप कर’’ असे मुक्ता बर्वेंनी सांगितले.
मी मुळात कमर्शियल आर्टिस्ट. चित्र, बॅनर्स, पोस्टर्स, रांगोळी, गणपती मूर्तींचे रंगकाम, डेकोरेशन करणारा. त्यामुळे मला या क्षेत्रात काम करायला अडचण आली नाही. या कलेने मला कामाचा आनंद तर दिलाच, त्याबरोबर नावसुद्धा दिलं. चरितार्थासाठी जोडधंदा दिला. व्यावसायिक, प्रायोगिक किंवा हौशी नाटकातील रंगभूषेत फरक नसतो, मी करत नाही. व्यक्तिरेखेनुसार काम करावं लागतं.
तालमीत दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार यांच्याशी चर्चा करून योग्य परिणाम साधावा लागतो. 2007 सालापासून मी ‘भद्रकाली’शी जोडला गेलो आहे. वेळेचे महत्त्व, आपल्या कामाप्रति शंभर टक्के योगदान, टीमवर्क आणि घरगुती जिव्हाळा हे मी मच्छिंद्र कांबळी (बाबुजी) आणि प्रसाद कांबळी यांच्याकडून शिकलो, जे माझ्या वैयक्तिक आयुष्यात आजही मला उपयोगी पडत आहे. विविध नाटकांच्या रंगभूषा करतानाच गणेशमूर्ती बनवणे, रांगोळी काढणे या कलाही जोपासतो. माझ्या आतापर्यंतच्या रंगभूषेच्या कारकीर्दीत अनेक नामवंत कलाकारांकडून खूप सहकार्य लाभत आहे, यापुढेही लाभत राहो आणि अनेक कामाच्या संधी मिळत राहोत आणि नवनव्या व्यक्तिरेखा रंगभूषेच्या माध्यमातून साकारता याव्यात हीच माझी इच्छा आहे.



























































