हिंदुस्थानच्या इस्रोने इतिहास रचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतराळातून थेट पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता असलेल्या ‘कार्टोसॅट-3’ या उपग्रहाचे हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. आपल्या या उपग्रहासह इस्रोने तब्बल 13 उपग्रहांचे प्रक्षेपण पीएसएलव्ही-सी-47 रॉकेटद्वारे एकाचवेळी केले. हा पराक्रम करत इस्रोने इतिहास रचला आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हाय रेज्युलेशन छायाचित्रे घेण्याची क्षमता ‘कार्टोसॅट-3’ या उपग्रहामध्ये असून अंतराळातून पृथ्वीचा नकाशा बनविण्यासाठी हिंदुस्थानला हा उपग्रह फायद्याचाच ठरणार आहे. हिंदुस्थानच्या ‘कार्टोसॅट-3’ या उपग्रहासोबत अमेरिकेच्या 13 लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-4 पी’ हे 12 लघु उपग्रह असून एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. ‘कार्टेसॅट-3’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. हे प्रक्षेपण झाले त्यावेळी इस्त्रोचे प्रमुख के. सिकन श्रीहरी कोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. ‘कार्टेसॅट-3’ उपग्रहाद्वारे मॅपिंग करता येणं शक्य होणार असून या उपग्रहाचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.

सुस्पष्ट छायाचित्रे मिळणार

इस्रोने बनविलेला ‘कार्टेसॅट-3’ हा उपग्रह खूपच प्रगत तंत्रज्ञानानुसार बनविण्यात आलेला असून त्याच्या मदतीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांमधील सुस्पष्ट छायाचित्रे घेता येणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 509 किलोमीटर वरच्या कक्षेत तो स्थिर करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही-सी-47 या प्रक्षेपक रॉकेटचे हे 21 के उड्डाण आहे. त्यात सहा घन इंधन मोटारी आहेत, असे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन

‘कार्टोसॅट-3’ या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो प्रमुख आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये मोदी म्हणतात, पीएसएलव्ही-सी-47 या रॉकेटद्वारे स्वदेशी बनावटीचे ‘कार्टोसॅट-3’ हा उपग्रह आणि त्यासोबत अमेरिकेचे डझनभर नॅनो उपग्रह यांचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याचा मला आनंद वाटतो. इस्रोने पुन्हा एकदा हिंदुस्थानची मान गौरवाने उंचावली असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.