
डोंबिवली शहरातील कुंभारखाणपाडा, राजीवनगर, गणेशनगर हा दाट लोकवस्तीचा सुमारे दोन किलोमीटरचा परिसर बालबाल बचावला. नवी मुंबईहून आलेल्या पेट्रोलच्या टँकरने एका इलेक्ट्रिक पोलला धडक देताच शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून आग भडकली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पेट्रोलचा टँकर जळून खाक झाला. घटनास्थळापासूनच काही अंतरावर पेट्रोलपंप होता. आग भडकली असती तर मोठा अनर्थ ओढावला असता.
डोंबिवली पश्चिमेकडील एकवीरा पेट्रोल पंपाजवळ नवी मुंबईहून पेट्रोल घेऊन सकाळी 11.30 च्या सुमारास टँकर आला होता. त्याचा चालक उमेशकुमार गौतम याचे नियंत्रण सुटले आणि हा टँकर थेट जवळच्या इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आदळला. काही क्षणातच पोलवरील विजेच्या तारा तुटल्या आणि स्पार्किंग झाले. ठिणग्या बाहेर पडू लागल्या. या ठिणग्यांचा संपर्क टँकरमधील पेट्रोलशी येताच आग लागली. झाकणे बंद असल्याने ही आग पसरली नाही. टँकरचा चालक उमेशकुमार याने प्रसंगावधान राखत खाली उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
इलेक्ट्रिक पोलला धडकल्याने शॉर्टसर्किट
आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड करताच जवळच्या पेट्रोलपंपावरील कर्मचाऱयांनी धाव घेतली. तेवढय़ात अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले. या जवानांनी भडकलेली आग काही वेळातच आटोक्यात आणली असल्याची माहिती फायर फायटर सुधीर दुशिंग यांनी दिली. इलेक्ट्रिक पोलवर असलेल्या तारा तुटून त्या टँकरवर पडल्यानेच पेट्रोलने पेट घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळाला लागूनच दाट लोकवस्तीचा सुमारे दोन किलोमीटरचा परिसर भयंकर संकटातून बचावला.






















































