वाणगावजवळ तीस गाई मृतावस्थेत सापडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाणगावच्या माटगाव गावाच्या तसेच परिसरातील शेतात, झुडपात तब्बल 30 ते 35 गाई मृतावस्थेत आढळल्या आहेत. मात्र या गाई नेमक्या कशाने दगावल्या याची माहिती मिळालेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याचा उलगडा होणार आहे.

माटगावच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती शेती आहे. त्यांत भाजीपाला किंवा अन्य पिकांची लागवड केली जाते, रात्रीच्या सुमारास साठ ते सत्तर मोकाट गाईंचा तांडा, कुंपण तोडून घुसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. याला कंटाळून एखाद्या बागायतदाराने वांग्यात अथवा भाजीपाल्यात थायमेटसारखे जहाल कीटकनाशक वापरून मोकाट गाईंना मारल्याची शक्यता गावकऱयांकडून वर्तवली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदनचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.