माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक कोर्टाने फडणवीस यांना समन्स बजावलं आहे. कोर्टाच्या वतीने नागपूर सदर बाजार पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना समन्स बजावले. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपविल्याप्रकरणी ही समन्स बजावलं आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2 गुन्हेगारी खटले निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखविले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक कोर्टाने त्यांना समन्स बजावले आहे’, अशी माहिती बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला होता. फडणवीसांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या प्रकरणाची सत्र न्यायालयातील सुनावणी सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंठपीठानं निकाल दिला.