सृष्टिदूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

निसर्गाला समजावून घेत, त्यावर कोणताही ओरखडा न पाडता निसर्ग आणि प्राणिजीवनावर अनेकविध वृत्तमालिका बनवणारे डेव्हिड ऍटनबरो. सृष्टीचा इतिहास आणि प्राणीशास्त्र या विषयांत अचंबित करणारा सखोल अभ्यास करत डेव्हिड यांनी निसर्गातील अनेक कुतूहलांचं विश्लेषण आपल्यासमोर उभं केलं.

माणसाच्या दृष्टिक्षेपाच्या पलीकडल्या जीवसृष्टीचे माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. मानवी वस्तीपासून दूर असलेले जग अनाकलनीय, गूढ, चमत्कृतीपूर्ण, निर्व्याज आणि शब्दशः नैसर्गिक असते. त्या विश्वामध्ये माणसाला प्रवेश नाही असं म्हणण्यापेक्षा एका गूढ भीतीने माणूस या प्राणिमात्रांच्या वाटय़ाला जात नाही. आपल्यासोबत नांदणारी एक जीवसृष्टी आहे, आर्क्टिक, अंटार्क्टिक समुद्र आणि दुर्धर, दुर्गम भागातील प्राणी-विश्व, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतात. त्यांची स्वतःची एक परिसंस्था निर्माण झालेली असते. दुर्गम भागात राहणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक यांचे सहजीवन हे सगळं ‘बीबीसी हिस्ट्री’ वाहिनीच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणारे डेव्हिड ऍटनबरो हिंदुस्थानातही प्रसिद्ध आहेत. वाईल्ड वर्ल्ड, लाइफ ऑन अर्थ, लाइफ इन कोल्ड ब्लड, लाइफ ऑफ अंडर ग्रोथ, प्लॅनेट अर्थ अशा अनेक दूरदर्शन मालिकांद्वारे त्यांनी हिंदुस्थानी प्रेक्षकांनाही काबीज केले.

डेव्हिड ऍटनबरो (जन्म 8 मे 1926, आयझलवर्थ, ब्रिटन) या अवलिया कलंदर 93 वर्षीय ब्रिटिश वृद्धाचा चाहता वर्ग जगभरात विखुरलेला आहे, ते याही वयात सुपरहीरो आहेत. निसर्गप्रेमी, वन्यजीव आणि पक्षी यांच्याबद्दल कुतूहल असणाऱ्या कोणत्याही माणसाला सर डेव्हिड माहीत नाहीत असे होऊ शकत नाही. वयाच्या सातव्या वर्षापासूनच डेव्हिडला जीवाश्म, वेगवेगळे दगड, जैविक अंश जमा करण्यामध्ये रस होता. त्यांच्या संग्रहाचे कौतुक तर झालेच, पण वयाच्या अकराव्या वर्षी एका प्राणीशास्त्र विभागासाठी त्यांच्या संग्रहाचा उपयोग झाला आणि इथेच त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा सापडली. पुढे त्यांनी ‘नॅचरल सायन्स’ या विषयात पदवी मिळवली. सृष्टीचा इतिहास आणि प्राणिशास्त्र याविषयी महत्त्वपूर्ण ठरेल अशी माहिती पुरवणारे एक विश्लेषक म्हणून ते समोर आले.

त्यांच्या व्यवसायाची सुरुवात ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या जगप्रसिद्ध माध्यमाच्या मार्फत झाली. डेव्हिड यांचा वैशिष्टय़पूर्ण अभ्यास, संशोधन, प्रवासाची आवड, विविध प्राणिमात्रांना त्यांचे जीवन समजून घेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे सगळे विषय आज पन्नास वर्षांनंतरही अत्यंत नावीन्यपूर्ण आणि कुतूहलाचे आहेत. त्यामुळे डेव्हिड हे लवकरच ब्रिटिश नागरिकांमध्ये ‘राष्ट्रीय संपत्ती’ आणि महत्त्वाच्या शंभर ब्रिटिशांपैकी एक ठरले. 1960 मध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी वाहिनीला राम राम ठोकला. बीबीसीच्या नॅशनल हिस्ट्री युनिटची स्थापना ब्रिस्टलमध्ये झाल्यानंतर सगळ्यात आधी डेव्हिड यांना विचारणा करण्यात आली. मात्र लंडन सोडायचे नसल्यामुळे त्यांनी नकार कळवला. 1951 मध्ये प्रवास आणि संशोधनाच्या माध्यमातून ‘झू क्वेस्ट’ची निर्मिती केली. या मालिकेच्या काही भागांचे ‘बीबीसी हिस्ट्री’वरून प्रसारित झाले आणि त्यानंतर मात्र त्यांनी शेकडो माहितीपटांची निर्मिती, निवेदन, अभिनय आणि प्रसारण केले. विशेष म्हणजे हिंदुस्थानातल्या ‘अ मॅजेस्टिक सेलिब्रेशनः वाइल्ड कर्नाटका’ या चित्रपटासाठी निवेदक म्हणून त्यांनी आपला आवाज दिला. कल्याण वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला हिंदुस्थानी निसर्ग इतिहासाच्या दृष्टीने महत्त्व आहे आणि कर्नाटकामधील जंगलांचे आणि तेथील प्राणीसृष्टीचे चित्रण चित्रपटात करण्यात आलेले आहे.

‘द ट्रायबल आय’, ‘द एक्सप्लोरर’ आणि लहान मुलांसाठी खास ‘फॅब्युलस ऍनिमर्ल्स’ अशा अनेक मालिका बीबीसीवरून प्रसारित झाल्या आहेत. तीसहून अधिक चित्रपट, चाळीसपेक्षा जास्त पुस्तके आणि शेकडो दूरदर्शन मालिका या माध्यमातून डेव्हिड खरंतर निसर्ग दूतच बनले आहेत. चित्रीकरण करत असताना प्राण्यांच्या जीवनामध्ये जी अस्थिरता आलेली आहे ती मुख्यतः माणसाच्या हस्तक्षेपामुळे हे त्यांच्या लक्षात आले.

त्यांच्या संशोधनादरम्यान त्यांना एक अत्यंत मूलगामी प्रश्न पडला आहे, जे देश कुपोषणग्रस्त आहेत त्यांना अन्न पुरवणे आपण कर्तव्य मानतो. खरंतर पृथ्वीवरील सजीवसृष्टीची सगळ्यात मोठी समस्या ही बेसुमार वाढणारी लोकसंख्या आहे याकडे कोणीच कसे लक्ष देत नाही? प्रश्न मूलगामी आहे. त्याचे उत्तर आणि उपाययोजना हिंदुस्थानसकट जगभरातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे, मात्र त्यावर बोलायची कोणाचीही इच्छा नाही. बेसुमार लोकसंख्या हे एक फार मोठे संकट सजीव विश्वाला गिळून टाकत आहे. गेल्या चार वर्षांपासून तापमानवाढीचा भस्मासुर जंगले जाळत आहे. त्या आगीत दुर्मिळ वनस्पती, प्राणी झपाटय़ाने नष्ट होत आहेत. तापमान वाढल्यामुळे शेकडो प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत हे त्यांच्या लक्षात आले. डेव्हिड त्यामुळे अत्यंत अस्वस्थ आहेत. पृथ्वीतलावरचे जैवविविधता जपण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. माणसासकट सर्व प्राणिमात्रांनी आणि वनस्पतींनी एकमेकांना पूरक होत एकोप्याने राहिले तरच पृथ्वीवरील जीवसृष्टी ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रगती करेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. माणसांबद्दल बोलताना ते म्हणतात, मानव हा ‘पृथ्वीतलाचा विध्वंस करणारी महामारी आहे’ आणि हा रोग त्वरित बरा करण्याची आणि जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. डेव्हिड यांना जगभरात अनेक प्रतिष्ठsच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नुकताच त्यांना प्रतिष्ठsचा ‘इंदिरा गांधी शांती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रणव मुखर्जी यांनी डेव्हिड यांच्या नावाची घोषणा करताना म्हटले आहे की, डेव्हिड ऍटनबरोसारखे अत्यंत बोटावर मोजण्याइतके लोकच सर्व सजीवमात्र आणि मानवी सहसंबंध यांचा समन्वय आणि समतोल साधण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या ग्रहगोलाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारे त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांना ‘इंदिरा गांधी शांती पुरस्कार’ (रु. 25 लाख रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र) प्रदान करण्यात येत आहे. सर डेव्हिड म्हणजे मानव आणि सजीवसृष्टीतील प्रत्येक घटकांमधला संवादी पूल, त्यांचा हिंदुस्थानच्या पवित्र भूमीत यथोचित गौरव पुरस्काराच्या निमित्ताने होत आहे.

[email protected]