
कोळशावरील वीज प्रकल्पात तयार होणाऱया विजेचे दर दिवसेंदिवस वाढत असताना राज्यात सौरऊर्जेनंतर आता पवन ऊर्जा मात्र स्वस्त होऊ लागली आहे. महावितरणने नुकतेच 500 मेगावॅटचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यामध्ये प्रथम सात मेगावॅटचा वीज संच उभारून तयार होणारी वीज केवळ 2 रुपये 52 पैसे एवढय़ा कमी दराने दिली जाणार आहे. त्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मंजुरी दिली आहे. याआधी तीन-साडेतीन रुपये युनिट एवढा दर होता. त्यामुळे भविष्यात वीज ग्राहकांना स्वस्त दराने वीज मिळू शकणार आहे.
महावितरणची विजेची दैनंदिन मागणी 20 हजार मेगावॅटहून अधिक आहे. सदर वीज पुरवठा करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून अपारंपरिक वीज वापराचा म्हणजे सौर, पवन, जलविद्युत ऊर्जा वापराचे टार्गेट पूर्ण करावे लागते. त्यासाठी त्यांना एकूण मागणीच्या सुमारे 14 टक्के वीज अपारंपरिक वीज प्रकल्पातून घ्यावी लागते. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने पवन ऊर्जेची क्षमता वाढवण्यासाठी 500 मेगावॅटचे पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार सात मेगावॅटचे सौर पवन ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामध्ये तयार होणारी वीज पुढील आठ वर्षांच्या दीर्घ मुदतीवर महावितरणला अल्प दराने मिळणार आहे. त्यास मंजुरी मिळावी म्हणून महावितरणने नुकतीच एमईआरसीकडे याचिका दाखल केली होती. त्याला आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे महावितरणला 2 रुपये 52 पैसे प्रतियुनिट एवढय़ा दराने वीज मिळणार आहे. याचा थेट फायदा वीज ग्राहकांना होणार आहे.
सौरऊर्जेचा दर 2 रुपये 82 पैसे
औष्णिक वीज प्रकल्प उभारणीचा आणि वीजनिर्मितीचा खर्च जादा असल्याने प्रतियुनिट विजेचा दर साडेतीन रुपयांपेक्षा जादा आहे. तुलनेत सौरऊर्जेचे दर कमी आहे. महावितरण ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजनें’तर्गत छोटे सौर प्रकल्प उभारत असून त्यामध्ये तयार होणाऱया विजेचा दर 2 रुपये 82 पैसे एवढा कमी असणार आहे.

























































