
प्रदूषणामुळे आयुष्य कमी होते असं देशातील कोणताही अभ्यास सांगत नाही, असे अजब विधान केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत केले. प्रदूषण आणि नागरिकांचे आयुष्यमान यांचा संबंध नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण भीती पसरवण्याचे काम करू नका, असे जावडेकर म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत प्रदूषणासंबधी प्रश्न विचारला होता. प्रदूषणामुळे लोकांचे आयुष्य चार वर्षांनी कमी होत आहे असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. अशा वेळी सरकार प्रदूषणाच्या समस्यांवर काय उपाययोजना करीत आहे, असा सवाल घोष यांनी केला. त्यावर उत्तर देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषण आणि आयुष्यमान यांचा संबंध सांगणाऱया अशा अभ्यासांत ‘फर्स्ट जनरेशन डेटा’ चा वापर करण्यात आलेला नसावा. प्रदूषणासंदर्भातील कायद्यात सुधारणा केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केली. या मागणीवर विचार करता येईल असे जावडेकर म्हणाले.
प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम’
प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दल जावडेकर म्हणाले, कार्बन उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. देशभरातील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम’चा शुभारंभ केला आहे. याअंतर्गत 102 शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांसाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.



























































