
>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीदत्त महाराजांनी सुरू केलेला ‘श्रीदत्तजन्मोत्सव’ केवळ ‘रावेर’पुरताच मर्यादित नाही, तर सर्वदूर प्रसिद्ध झालेला आहे.
श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार श्रीदत्त महाराज पुढे काही काळ नर्मदेच्या तीरावर महादेवाच्या मंदिरात वास्तव्य करते झाले. खांडवा शहरापासून जवळ, घनगर्द वनराईने व्यापलेल्या परिसरातील या महादेव मंदिरालगतच्या पद्मकुंडात स्नान करून श्रीदत्त महाराज प्रातःकाळी अनुष्ठानास बसत असत. सुदृढ देहयष्टी, आजानुबाहू, मस्तकावरील विपुल केशसंभार, छातीपर्यंत रुळणारी दाढी असे ईश्वर चिंतनात ध्यानमग्न होत कठोर तपश्चर्येने सिद्ध झालेले श्रीदत्त महाराजांचे तेजःपुंज रूप त्या जंगलात गोवऱयांसाठी शेण वेचायला येणाऱया एका वृद्ध स्त्र्ााrने पाहिले.
ही वृद्ध स्त्र्ााr खांडवा येथे आर्थिक विपन्नावस्थेची झळ भोगणाऱया रतनलाल बजाज या सद्गृहस्थाची पणजी होती. ती जेव्हा जंगलात जात असे तेव्हा श्रीदत्त महाराजांना नित्यनेमपूर्वक लांबूनच नमस्कार करीत असे. असे कित्येक दिवस, कित्येक महिने गेले. पुढे एकदा ही गोष्ट लक्षात येताच श्रीदत्त महाराजांनी त्या वृद्ध स्त्र्ााrची विचारपूस केली. तेव्हा तिने श्रीमहाराजांना वंदन केले, आपली परिस्थिती सांगितली आणि आपल्या घरी येण्याची विनंती केली. श्रीमहाराजांनी तसे कबूल केले आणि एके दिवशी ते बजाज यांच्या घरी गेले. परिस्थितीने गरीब असलेल्या कुटुंबातील त्या वृद्ध स्त्र्ााrने श्रीदत्त महाराजांसाठी मोठय़ा प्रेमाने सातूच्या पिठाचा लाडू बनविला आणि त्यांच्यासमोर ठेवला. मात्र श्रीमहाराजांनी लाडू फोडून त्याचा चुरा घरभर फेकला अन् प्रसन्न चित्ताने ते तिथून निघून गेले. त्या दिवसापासून बजाज कुटुंबाची आर्थिक स्थिती विलक्षण सुधारली, साधनसंपत्ती वाढती झाली. पुढे अल्पावधीतच बजाज यांनी व्यवसायात जम बसवला अन् राहण्यासाठी भलेमोठे नवे घरदेखील बांधले तेव्हादेखील त्यांनी श्रीदत्त महाराजांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. यावेळी मात्र मागील सर्व कसर भरून काढत बजाज कुटुंबीयांनी श्रीदत्त महाराजांची पाद्यपूजा मोठय़ा थाटामाटाने केली. श्रीदत्त महाराजांच्या हस्ते नव्या घरामध्ये मुहूर्ताचा खांब पुरण्यात आला. आजही दिवाळीच्या दिवसांत श्रीमहाराजांच्या हस्ते स्थापन केलेल्या या खांबाची पूजा बजाज कुटुंबीयांकडून करण्यात येते.
पुढे श्रीदत्त महाराजांचे वास्तव्य खांडवा येथील विठ्ठल मंदिरात होऊ लागले. येथील प्रसन्नता आणि पावित्र्य श्रीमहाराजांचे मन मोहविते झाले. या मंदिरातील श्रीविठ्ठल-रखुमाईची सुबक मूर्ती पाहून श्रीदत्त महाराजांचे अष्टसात्त्विक भाव जागृत होत असत. ते येथे अतिशय सुमधूर आवाजात भजने गात असत. श्रीपांडुरंगाची आणि श्रीदत्ताची भजने गाताना श्रीमहाराजांच्या चित्तवृत्ती फुलून येत असे आणि त्यांचे देहभान हरपून जात असे. येथून जवळच असलेला तापी नदीचा परिसरही श्रीदत्तमहाराजांना नर्मदा परिसराइतकाच प्रिय होता. तापी नदीतीरावरही श्रीमहाराज बराच काळ ध्यानमग्न अवस्थेत दंग होत असत. पुढे नजीकच्या बुऱहाणपूर परिसरातही श्रीमहाराजांचे जाणे-येणे अन् मुक्कामही होत असे. खांडवा, बुऱहाणपूर तसेच तापी-नर्मदा तीरावरील या तेजःपुंज सत्पुरुषाची चर्चा सर्वत्र पसरली अन् अखेर ‘रावेर’पर्यंत पोहोचली.
‘रावेर’ हे पूर्वीच्या खान्देश प्रांतातील (सध्या जळगाव जिल्हा) तालुक्याचे गाव होते. भुसावळ-बुऱहाणपूर मार्गावरील ‘रावेर’ गावातील शेषाद्री बुवा, दगडू गंभीर, बारूदवाले आदी मंडळी व्यापाराच्या निमित्ताने बुऱहाणपुरास जात असत. श्रीमहाराजांची कीर्ती कानावर आल्यामुळे ही मंडळी श्रीमहाराजांचा शोध घेत त्यांच्यापाशी आली. श्रीदत्त महाराजांच्या दर्शनाने भारावलेल्या रावेरकर मंडळींनी त्यांना ‘‘आपल्यासोबत रावेर येथे यावे’’ अशी विनंती केली. त्यांचा प्रेमळ आग्रह पाहून श्रीमहाराजांनी त्यांना ‘‘आपण लवकरच ‘रावेर’ येथे येऊ’’ असे सांगितले. श्रीदत्त महाराज आपल्यासोबत येतील या अपेक्षेने आणि तयारीने गेलेली रावेरकर मंडळी ते न आल्याने हताश मनाने रावेर येथे परतली. मात्र इथे येताच त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ही मंडळी माघारी पोहोचेपर्यंत रावेरच्या वेशीवर बुऱहाणपूर रस्त्यावरील श्रीहनुमान मंदिरामध्ये श्रीदत्त महाराज आधीच येऊन बसले होते.
श्रीमहाराजांच्या आमगनाने आनंदित झालेल्या रावेरकरांनी थाटामाटात त्यांचे स्वागत केले. सर्वत्र जल्लोष पसरला. श्रीदत्त महाराजांसारखा सिद्ध सत्पुरुष आपल्या गावात सदेह अवतरला आहे याचा आनंद रावेरकरांच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होता. मात्र हा आनंद झाकोळला गेला, जेव्हा श्रीदत्त महाराजांनी गावात येऊन न राहता गावाच्या मध्यभागातून वाहणाऱया नाल्याजवळच्या जागी राहण्याचे ठरविले. हा परिसर अस्वच्छ होता. मात्र याच जागी श्रीदत्त महाराजांना पुन्हा एकदा श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडले, तेव्हा तोच सूचक निर्देश असल्याचे जाणून घेत श्रीदत्त महाराजांनी तिथे श्रीदत्तात्रेयांचे मंदिर उभारण्याचा निश्चय केला.
सद्गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वरही तत्पर असतो याचा प्रत्यय देण्यासाठीच रावेरकरांनी पुढाकार घेतला अन् तिथे श्रीदत्तात्रेयांचे भव्य देवालय साकारले. श्रीदत्त महाराजांना अभिप्रेत असलेली भगवान श्रीदत्तप्रभूंची मूर्ती गावातील कासार बंधूंनी अप्रतिमरीत्या साकारली. ही एकमुखी पंचधातूची मूर्ती आजही श्रीदत्त महाराजांची आठवण जागवत ‘रावेर’च्या श्रीदत्त मंदिराचे वैभव वृद्धिंगत करीत आहे. या दत्तमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे कार्य श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या राजगुरू कुटुंबाकडे सोपविण्यात आले. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला श्रीदत्तजन्माच्या शुभमुहूर्तावर श्रीदत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीदत्तगुरूंनी दिलेल्या पादुका व छडीदेखील तिथे ठेवण्यात आली. लोकांचा उत्साह, उत्सवाची धामधूम यासोबतच श्रीदत्तमूर्तीचे तेजस्वी रूप पाहताच श्रीदत्त महाराजांचा भावावेग उफाळून आला. त्यांच्या मनामध्ये ‘हेच माझे माहूर आणि हेच माझे गाणगापूर’ असे भाव प्रकटले. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात श्रीदत्तजन्मोत्सव आनंदाने साजरा झाला.
श्रीदत्त महाराजांच्या संकल्पनेनुसार नक्षीदार कोरीव लाकडी खांबावर उभारलेल्या व उत्तम वास्तुशैलीचा प्रत्यय देणाऱया या दत्तमंदिरातील देवांची पूजाअर्चा आणि सण-उत्सवादी कार्ये नित्यनेमाने होणे आवश्यक होते. तेव्हा ही जबाबदारी श्रीदत्त महाराजांना प्रिय अशा रावजीभट राजगुरू यांच्याकडे आली व तिथपासून ती आजतागायत राजगुरू कुटुंबाकडेच आहे. सोबतच श्रीमहाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ते वद्य पंचमीपर्यंत श्रीदत्तजयंती उत्सवाची प्रथा सुरू केली. समाजातील अज्ञान, अंधकार दूर व्हावा आणि परस्परांतील भक्तिप्रेम वाढावे या हेतूने सर्व स्तरांतील लोकांना श्रीदत्त महाराजांनी या उत्सवात सहभागी करून घेतले. भजन-कीर्तन, निशाणपूजन, षोडशोपचार पूजा, रथोत्सव, दारूकाम याद्वारे आजपावेतो श्रीदत्तजन्मोत्सव साजरा केला जातो. आजवर या उत्सवात लक्षावधी भाविक सामील झाले आहेत. (पूर्वार्ध)




























































